आळंदीत खासगी वारकरी संस्थेत विनयभंग, अल्पवयीन मुलाकडे संगीत शिक्षकाची शरीर सुखाची मागणी
पुणे : आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत पु्न्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडली आहे. देहू फाटा परिसरातील एका संस्थेत 15 वर्षीय विद्यार्थ्यांकडे संगीत विषयाच्या शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली. घाबरलेल्या विद्यार्थ्याने संस्थाचालकाला ही बाब सांगितली. मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर विद्यार्थ्याने दिघी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शिक्षकासह संस्था चालकावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आळंदी आणि परिसरात वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. म्हणूनचं इथल्या खाजगी शिक्षण संस्था बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. जानेवारीपासून हा तिसरा तर आतापर्यंत सातवा गुन्हा दाखल झाला आहे.
अनधिकृत संस्थांचे सर्वेक्षण झालं पण…
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुद्धा आळंदीतील सातत्याने घडणाऱ्या या प्रकाराला गांभीर्यानं घेतलं आहे. त्यांनी या आधी 48 तासांमध्ये अनधिकृत खासगी वारकरी संस्था बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी वीस पथकं नेमून आळंदीत सर्वेक्षणही केलं. मात्र आतापर्यंत किती संस्था बेकायदा किंवा अनधिकृत आहेत याची माहिती समोर आलीच नाही. रुपाली चाकणकर यांचंही याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय. त्याचमुळे आताची ही ताजी घटना घडली आहे.
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमधील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या आणि मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
खासगी वसतीगृहांसाठी नियमावली
बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार खाजगी वसतीगृहांसाठी नियमावली करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्थांचा अहवाल सात दिवसात सादर करावा असं आदेश देण्यात आले आहेत. संस्था सुरू करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभाग यांची परवानगी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसलेल्या संस्थांवर दोन दिवसात कारवाई करण्याचा आदेश या आधी देण्यात आला आहे.
12 वर्षांच्या दोन मुलांवर अत्याचार
या आधी, जानेवारी महिन्यात आळंदीतील एका वारकरी शिक्षण संस्थेत 12 वर्षांच्या दोन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडली होती. एका संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या 28 वर्षांच्या तरुणानं 12 वर्षांच्या दोन मुलांना त्याच्या वासनेची शिकार केली होती. त्या प्रकाराने संपूर्ण आळंदी परिसर हादरला होता.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.