राममंदिरातील सर्व वस्तू सुरक्षित आहेत.
न्यासाच्या कोषाध्यक्षांकडून विस्तृत माहिती प्रसिद्ध
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्योतील राम मंदिराला भक्तांकडून समर्पित करण्यात आलेल्या सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित असून त्यांची नोंदही ठेवण्यात आली आहे, या माहितीचा पुनरुच्चार राम मंदिराचे कोषप्रमुख स्वामी गोविंद गिरी यांनी केला आहे. न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी त्यागपत्र दिल्यानंतर सोमवारी झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीतही त्यांनी ही माहिती दिलेली आहे. मंगळवारी पत्रकारांसमोर त्यांनी पुन्हा एकदा सर्व वस्तू सुरक्षित असल्याचे स्पष्ट करताना अधिक विस्तृत माहिती दिली.
न्यासाकडे आजमितीला 30 किलोग्रॅम वजनाची सुवर्णसदृश आभूषणे आणि वस्तू नोंद आहेत. तसेच 1 हजार 518 किलोग्रॅम वजनाच्या चांदीसदृश वस्तूही आहेत. या वस्तूंपैकी कशाचीही चोरी झालेली नाही. भक्तांनी समर्पित केलेल्या अन्य मौल्यवान वस्तू आणि आभूषणेही सुरक्षित आहेत. या सर्व वस्तूंची रीतसर नोंद आधीपासूनच करण्यात आलेली असून अपहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष अन्वेषण दलाला ही माहिती देण्यात आली आहे. ज्या भक्तांनी वस्तू दिलेल्या आहेत, त्यांना त्या पहावयाच्या असतील, तर त्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन न्यासाच्या कार्यालयात आल्यास त्यांना त्या दाखविण्यात येणार आहेत. कोणत्याही वस्तूचा अपहार झालेला नाही, असे प्रतिपादन त्यांनी वृत्तसंकडे केले आहे.
एकंदर किती वस्तू…
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाकडे आजमितीस 2 हजार 926 मौल्यवान वस्तू आहेत. तसेच, भक्तांनी समर्पित केलेले 1 किलोग्रॅम वजनाचे ‘सुवर्ण रामचरितमानस’ही कोठेही हरविलेले नसून ते सुरक्षित आहे. तसेच एक हिरेजडित मालाही समर्पित करण्यात आली असून ती सुरक्षित आहे. या वस्तूंपैकी महत्वाच्या वस्तू सोमवारी न्यासाच्या बैठकीनंतर पत्रकारांसमोर सादर करण्यात आल्या होत्या.
70 वेळा चोरीचे प्रकार ?
राम मंदीर अपहार प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने न्यासाच्या विनंतीवरुन तपास करण्यासाठी विशेष अन्वेषण दलाची स्थापना केली आहे. या दलाने आपला अंतरिम अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात काही प्रक्रियात्मक त्रुटींवर बोट ठेवले आहे. दानपेटीतील दानाची गणना करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली होती. त्यामुळे साधारणत: दीड महिन्यांच्या कालावधीत दानधनाच्या चोरीचे 70 प्रकार घडले आहेत, असे सीसीटीव्ही फूटेजवरुन दिसून येत आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे. दानपेट्यांच्या चाव्या रामशंकर यादव (टिन्नू यादव) याच्याकडे होत्या. त्याने त्याचा नातेवाईक मनीष यादव याला दानधनाची गणना करण्याच्या कामावर नियुक्त केले. मनीष यादव हाच प्रामुख्याने ही गणना करीत होता. दानमोजणीचे उत्तरदायित्व सुभाष श्रीवास्तव यांच्याकडे सोपविण्यात आले होते. जे दानधन अवैधरित्या मंदिराच्या बाहेर नेण्यात आले, ते श्रीवास्तव याच्या उपस्थितीतच नेण्यात आले, असे निरीक्षणही अहवालात आहे.
वेगळे काढले नोटांचे गठ्ठे
दान पेटीत भक्तांनी टाकलेल्या सर्व नोटांचा हिशेब ठेवण्यात आला नव्हता. प्रत्येक दिवशी नोटांचे काही गठ्ठे वेगळे ठेवण्यात येऊन ते अवैधरित्या मंदिराच्या बाहेर नेण्यात येत असत. त्यानंतर आरोपींमध्ये त्यांची वाटणी होत असे. काही गठ्ठे आरोपींनी आपल्या मोज्यांमध्ये लपवून बाहेर नेले, असेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसून आले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
प्रक्रिया शिथील
दानपेटीतील धन मोजण्याचे उत्तरदायित्व, हे धन ज्या बँकेत जमा होत असे, त्या बँकेचीही होती. बँकेने काही कर्मचारी नियुक्त केले होते. राम मंदीर न्यास आणि बँक यांच्यात जो करार झाला होता, त्यात दानाची गणना कोणी आणि करशी करावी, तसेच या कार्यावर लक्ष कसे ठेवण्यात यावे, यासंबंधी कठोर नियम असल्याचे दिसून येते. तथापि, फेब्रुवारी 2025 पासून गणना कर्मचाऱ्यांची झडती घेण्याच्या कामात ढिलाई निर्माण झाली होती, असेही दिसून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आली आहे. बँकेशी केलेल्या कराराचे कठोर कार्यान्वयन करण्याचे उत्तरदायित्व विश्वस्त अनिल मिश्रा यांचकडे होते. तथापि, मोजणी कर्मचाऱ्यांवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि ते बाहेर जाताना त्यांची झडती घेणे, ही कामे दक्षतापूर्वक करण्यात आलेली नाहीत, असेही विशेष अन्वेषण दलाला आढळले आहे, असे अहवालात स्पष्ट केले गेले आहे, असे काही वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे.
कठोर कारवाई होणार
ड राम मंदीर अपहार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा
ड राम मंदिराला भक्तांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंची रीतसर नोंद, व्यवस्था
ड प्रक्रियात्मक त्रुटींमुळे दानपेट्यांमधील धनाच्या चोरीचे प्रकार : अहवाल
ड तपास लवकरात लवकर संपवून न्यायालयीन प्रक्रियेचा प्रारंभ केला जाणार
Comments are closed.