अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानपरिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्राचे अनुभवी नेतृत्व शरद पवार राज्यसभेवर गेले. त्यांना सर्वांनी पाठिंबा दिला. आताच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष, इतर मित्रपक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची भूमिका अशी होती की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विधानपरिषदेत जावे, अशी आमची सर्वांची धारणा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला. सोनिया गांधींनी पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका कायम ठेवली. त्यांच्या पक्षात, आमच्या पक्षात आणि मित्रपक्षांमध्ये सर्वजण आग्रह करत असताना थांबण्याचा निर्णय घेणे ही मोठी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीत सुसंवादातून चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करतो, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार आहोत. तसेच महायुतीतील घटक शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधातही आमची भूमिका कायम राहील. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पातळीवर संविधानिक मूल्यांची पायमल्ली करत असल्याने त्यांच्या विरोधातील आमचा संघर्ष पुढेही सुरू राहील, असेही सपकाळ म्हणाले.

Comments are closed.