अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?

अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथमध्ये जाहीर झालेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीनंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. “युती 100 टक्केच असायला हवी,” असे म्हणत शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी या युतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पक्षाकडे स्पष्ट बहुमत असताना भाजपसोबत जाण्याची गरज काय? असा सवाल करत त्यांनी घरच्यांनाच लक्ष्य केले आहे. यामुळे अंबरनाथमधील युतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर मात्र अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. गुरुवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून जवळपास 90 टक्के युती झाल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र, दहा टक्के वरिष्ठांच्या आदेशानंतर युती अधिकृत होणार असल्याची पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले आहे. या युतीची घोषणा झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत भाजप आणि शिवसेनेमधील नगरसेवकांची नाराजी समोर आलेली पाहायला मिळत आहे.

Ambernath Nagar Parishad:  शिवसेना शहरप्रमुखांचा स्वपक्षीय नेत्यांवर निशाणा

एकीकडे काँग्रेसमधून भाजपमध्ये सत्तेत बसण्यासाठी पक्षप्रवेश केलेले काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी युतीच्या बैठकीला दांडी मारत आपली नाराजगी व्यक्त केली तर दुसरीकडे शिवसेनेमधील काही नगरसेवक पत्रकार परिषदेतून निघून जात असल्याचे दिसले. इतकेच नाही तर शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आपली नाराजी उघड करत थेट स्वपक्षीय नेत्यांवर आणि युतीवर निशाणा साधला आहे.

Ambernath Nagar Parishad:  निवडणुकीतील ‘अंतर्गत खेळ’ अंगाशी आल्यानेच युतीचा घाट?

90 टक्के कुठली युती नसते. युती ही शंभर टक्के असते. जी निवडणूक पूर्वी व्हायला हवी होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार नगरसेवक घेऊन जर आमचे संख्याबळ 32 झाले आहे आणि अधिकृत गट म्हणून आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील सांगितले आहे. त्यामुळे आमचे संख्याबळ जास्त असून आपल्याला भाजपकडे जाण्याची गरज नव्हती. स्वतः भाजपने आपल्याकडे मागणी केली पाहिजे होती. मात्र, काही लोक निवडणुकीच्या आधी भाजपा बरोबर जाऊन काम करायची इच्छा  व्यक्त करत होते. मात्र, वरिष्ठांच्या निर्णयामुळे आतून जो निवडणुकीत खेळ खेळला तो त्यांच्या अंगाशी आला. म्हणून आता हा युतीचा प्रयत्न केलेला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी नाव न घेता स्थानिक नेत्यांवर (विशेषतः आमदार बालाजी किणीकर यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत) केलाय. यामुळे अंबरनाथमध्ये युतीची घोषणा झाली असली तरी नेत्यांमधील ‘मने’ मात्र अजूनही जुळलेली नाहीत, हेच या वादातून दिसून येत आहे.

आणखी वाचा

Maharashtra Reservation Policy: स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, ‘मागासवर्गीयांचे मंत्री…’

आणखी वाचा

Comments are closed.