मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष

ठाणे : राज्यात यंदाच्या नगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच अंबरनाथ (Ambernath) नगरपालिका चर्चेत राहिले आहे. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याआधीच गोळीबारामुळे अंबरनाथ गाजले होते. येथील शिवसेना आणि भाजपामधील वाद सर्वश्रुत आहे. त्यातच, गेल्याच आठवड्यात भाजपने (BJP) काँग्रेसच्या पाठिंब्यावर येथे सत्ता स्थापन केल्यानेही ही नगरपालिका चर्चेत आली होती. अखेर, काँग्रेसने येथील सर्वच नगरसेवकांचे निलंबन केल्यानंतर चक्क भाजपनेच या नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. आता, येथील नगरपालिकेत शिवसेनेच्या मदतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे, भाजपला दूर ठेवत शिंदेंच्या शिवसेनेनं (Shivsena) राजकीय डाव टाकला आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांची अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली. येथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या खेळीने भाजपचा डाव फसला. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपला वरचढ करत शिंदेंच्या शिवसेनेनं येथील नगर परिषदेमध्ये बहुमताने उमेदवार निवडून आणले. येथे अनुक्रमे शिवसेना-भाजपचे 32 विरुद्ध 28 फरकाने नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खेळीने त्यांनी भाजपाला धोबी पछाड दिला. मात्र, भाजपा आमच्यासोबत आली असती तर आनंद झाला असता, अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात असलो तरी सगळ्यांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टीने काम करणार असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच, भाजप शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करेल असे मला सांगण्यात आले होते, भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत माझं बोलणंही झालं होतं. मात्र, भाजपने भूमिका बदलल्याने आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचेही शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, 32 नगरसेवकांची संख्या असताना स्वीकृत सदस्य हे शिवसेना महायुतीला तीन मिळायला हवे होते. मात्र, अध्यक्षस्थानी अधिकाऱ्यांनी दोनच स्वीकृत नगरसेवक शिवसेना महायुतीला दिले आहेत. त्या संदर्भात अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा झाली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

भाजपचा नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष

अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असून उपनगराध्यक्ष पद आणि गटनेता पदाची निवड आज करण्यात आली. भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन गट स्थापन केल्याचा दावा केला होता. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना फोडून स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देत शिवसेनेनं इथे भाजपला धक्का दिला. त्यामुळेच, कमी संख्या असतानाही राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष बनले आहेत.

हेही वाचा

राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार

आणखी वाचा

Comments are closed.