पुतिन यांना हत्या आणि सत्तापालटाची भीती; सुरक्षेत करण्यात आले मोठे बदल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. हत्या किंवा सत्तापालटाच्या शक्यतेमुळे पुतिन आता आपला बहुतांश वेळ अंडरग्राउंड बंकरमध्ये घालवत असून त्यांचे संपूर्ण लक्ष युक्रेन युद्धावर केंद्रित आहे, असा दावा ‘फायनान्शियल टाइम्स’च्या वृत्तात करण्यात आला आहे. पुतिन आता मॉस्को किंवा वाल्दाई येथील आपल्या निवासस्थानी राहण्याऐवजी दक्षिण रशियातील क्रास्नोदार भागातील सुरक्षित बंकरमधून अनेक आठवडे कारभार पाहत आहेत. या काळात परिस्थिती सामान्य असल्याचे भासवण्यासाठी रशियन सरकारी मीडियाकडून त्यांचे जुने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत.

मार्च महिन्यापासून वाढलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या धोक्यामुळे सुरक्षा यंत्रणा फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसने (FSO) सुरक्षेत प्रचंड वाढ केली आहे. युक्रेनचे ड्रोन हल्ले आणि रशियाच्या अनेक बड्या लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्यांनंतर रशियाची चिंता अधिकच वाढली आहे. पुतिन यांच्या सुरक्षेचा भाग म्हणून आता त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. पुतिन यांचे आचारी, फोटोग्राफर आणि अंगरक्षक यांना मोबाईल फोन, इंटरनेट आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांच्या घरांवरही पाळत ठेवली जात आहे.

राजधानी मॉस्कोमध्ये सध्या हाय अलर्ट असून स्निफर डॉग्सच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जात आहे. संभाव्य ड्रोन हल्ले रोखण्यासाठी मॉस्को नदीच्या काठावर तैनात करण्यात आलेली सुरक्षा आणि अलीकडेच झालेली इंटरनेट बंदी याकडेही सुरक्षेचाच एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

Comments are closed.