डॉ. आंबेडकरांचा वेळोवेळी अपमान करणाऱ्या काँग्रेसची रॅली काढून नौटंकी, आ. अमित गोरखेंचा हल्लाबोल
नागपूर: काँग्रेस पक्षाने नेते आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथून सुरू केलेल्या ‘संविधान सत्याग्रह पदयात्रे’वर भाजप आमदार अमित गोरखे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. आमदार गोरखे यांनी या यात्रेला ‘काँग्रेसची नौटंकी’ आणि ‘ढोंगीपणा’ असे संबोधले. त्यांनी म्हटले की, ज्या काँग्रेसने आपल्या कार्यकाळात संविधानाचा सर्वाधिक अपमान केला, संविधानाला पायदळी तुडवले आणि त्यात मनमानी बदल केले, तोच पक्ष आज ‘संविधान वाचवण्याचे नाटक’ करत आहे. गोरखे यांनी काँग्रेसच्या इतिहासातील अनेक गंभीर घटनांचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, देशात आणीबाणी लादून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून संविधानाची हत्या कोणी केली? राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणात न्यायालयाचा निर्णय फिरवून तुष्टीकरणाचं राजकारण कोणी केलं?असा सवालही त्यांनी केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने एका कुटुंबाच्या फायद्यासाठी संविधान आणि लोकशाहीला कमकुवत करण्याचे काम केले असून, त्यामुळे त्यांना संविधान सत्याग्रहावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. याउलट, भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारने संविधानाला सर्वोच्च स्थान दिले आहे. भाजपने ‘एक देश, एक संविधान’चा नारा देत कलम ३७० हटवून खरं संविधान लागू केले आहे.
गोरखे यांनी काँग्रेसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, सुरुवातीपासूनच काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अपमान केला. नेहरूंनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवून आरक्षणाला विरोध करण्याचे निर्देश दिले होते. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांनी लढवलेल्या दोन्ही निवडणुकांत त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना पराभूत केले. नेहरूंनी हयात असताना स्वतःसाठी भारतरत्न घेतला, पण काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांना मरणोत्तरही ‘भारतरत्न’ दिला नाही. तो सन्मान व्ही.पी. सिंह आणि भाजप सरकारच्या कार्यकाळात देण्यात आला. गांधी घराण्यापेक्षा मोठे ठरू नयेत, हीच काँग्रेसची मानसिकता होती.
डॉ. बाबासाहेबांचे देहावसान झाल्यावर त्यांचे स्मारक उभे करण्याची इच्छा काँग्रेसला झाली नाही. मोदी सरकारने लंडनमधील बाबासाहेबांचे घर विकत घेऊन स्मारक उभारले. बाबासाहेबांचे नाव पुसणे आणि त्यांच्या कार्याला झाकणे हेच काँग्रेसचे राजकारण राहिले असून, हातात कोरे संविधान घेऊन ढोंग करणे हा त्यांचा खरा चेहरा आहे, असे गोरखे यांनी शेवटी नमूद केले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.