भडकाऊ विधानांना बळी पडू नका, करिअरची होळी करु नका, अमोल कोल्हेंचं तरुणांना आवाहन
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील युवकांनी भडकाऊ विधानांना बळी पडू नका असं आवाहन केलं आहे. कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची, करिअरची होळी होऊ देऊ नका, अशी महाराष्ट्रातील युवकांना विनंती करतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
औरंग्याविषयी कुणालाही ममत्व असण्याचं काही कारण नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाशी मी सहमत आहे की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमामंडन हे होऊ दिलं जाणार नाही किंवा होऊ देऊ नये, या विधानाशी सहमत आहे. मात्र, ही औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
जेव्हा 27 वर्ष 1681 मध्ये औरंग्या दख्खनवर चालून आला. त्यानंतर 27 वर्ष छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी साहेब, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, अठरा पगड मावळे लढले. गवताला भाले फुटले, प्रत्येक झोपडी किल्ला झाला. हा जो महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास आहे, 27 वर्ष टाचा घासून सुद्धा औरंग्याला परत जाता आलं नाही याची साक्ष ती कबर देते. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याचा हाच अंजाम होईल हे ही कबर दाखवून देते, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं.
अमोल कोल्हे पुढं म्हणाले, आज संसदेतही मागणी करणार आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलंय की या कबरीच्या परिसरात मराठ्यांच्या शौर्याचं यथोचित स्मारक व्हावं. या वादावर पडदा टाकावा. महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो की पुन्हा एकदा शांतता पाळा. 300-350 वर्षांपूर्वीची घटना उकरून काढून ना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ना सोयाबीनला भाव मिळणार आहे. ना कापसाला भाव मिळणार आहे. दिवसाला 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत त्यावर मार्ग निघणारे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे यांच्याकडून व्हिडिओ शेअर करत औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्या व्हिडिओत ते म्हणाले महाराष्ट्रातील तरुणांना हात जोडून विनंती कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वत:च्या भविष्याची होळी होऊ देऊ नका. सत्ता येते जाते, राज्यकर्ते येतात जातात, बदलतात. जर केसेस तुमच्या पाठीमागं लागल्या तर त्या केसेसपाई तुमच्या करिअरची राखरांगोळी होऊ शकते. करिअरमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमच्या पालकांनी ज्या खस्ता खाऊन तुमचं शिक्षण केलंय, तुमच्या करिअरची स्वप्न पाहिली, त्या स्वप्नांना कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी नख लागू देऊ नका. कोणत्याही अशांत राज्यात गुंतवणूक येत नाही. जर गुंतवणूक आली नाही तर उद्योगधंदे वाढत नाहीत. बेरोजगारांचे तांडे आपल्याला राज्यात नकोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न ते लोककल्याणकारी राज्याचं स्वप्न पाहिलं. इतिहासातील दाखल्यांवरुन एकमेकांची डोकी फोडून आपलं राज्य अशांत करु नका. स्वत:च्या भविष्यात काटे पेरु नका, असं अमोल कोल्हे म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=YRCWUULOKN4
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.