निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : गायकवाड


महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत संजय गायकवाड : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत  मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुबार मतदारांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर मी समाधानी नसल्याचे मत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?

निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत मात्र, दुबार मतदारांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर मी समाधानी नसल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. एकट्या बुलढाण्यात हजारो मतदारांची नावे दुबार आहेत तर राज्यातील लाखो मतदारांकडून निवडणूक आयोग हमीपत्र घेणार आहे का? असा सवाल गायकवाड यांनी केला आहे. ही नावे डिलीट केली असती तर बरं झालं असतं आणि दहा दिवस निवडणुका उशिरा घेतल्यास तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही असे गायकडवाड म्हणाले. राज्यात महायुतीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. जो चांगलं काम करेल तो निवडणुका जिंकेल असेही आमदार गायकवाड म्हणाले. राज ठाकरे महा विकास आघाडीत आले तरी ग्रामीण भागात त्याचा प्रभाव पडणार नाही. मात्र, मुंबई पुण्याकडे थोडाफार फायदा राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला होऊ शकतो असेही गायकवाड म्हणाले.

जिथे स्वबळावर लढायचे आहे तिथे पक्ष ताकतीने निवडणुकीला सामोरे जाणार

निवडणुकांची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला आहे. तर या निवडणुकीत जिथे महायुती म्हणून लढता येईल तिथे महायुती म्हणून लढू, जिथे स्वबळावर लढायचे आहे तिथे पक्ष ताकतीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा या निवडणुकीत निकालाच्या रूपाने प्रभाव दिसून येणार असल्याचे मिटकरी म्हणाले.

जय पवार यांच्या रुपाने राज्याला एक नवा संस्कृत आणि अभ्यासू चेहरा मिळणार

दरम्यान  बारामती नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीचेही त्यांनी स्वागत केलं आहे.   जय पवार यांच्या रुपाने राज्याला एक नवा संस्कृत आणि अभ्यासू चेहरा मिळणार असल्याचं आमदार मिटकरी यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल

आणखी वाचा

Comments are closed.