अजितदादा असताना तटकरेंना कंटाळून राजीनामास्त्र उपसलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा गेम झाल
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (DCM Ajit Pawar) हे हयात असताना पक्षातील काही सेलच्या अध्यक्षांनी २६ जानेवारी रोजी पुण्यात आपला राजीनामा हा अजित पवार यांच्याकडे सोपवला होता. तर ते राजीनामे अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मंजूर केलेले नव्हते अशीही माहिती आहे. पण अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षाकडून या सर्व सेलच्या अध्यक्षांचे राजीनामे कारणे न विचारताच मंजूर करण्यात आल्याची माहिती काल (बुधवारी, ता ४) समोर आली होती. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे.
भविष्यात ही बाब चिंताजनक ठरू शकते
अमोल मिटकरी याबाबत बोलताना म्हणाले की, काही सेलच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली हे मला माध्यमातून समजलं. त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलं होतं, घाई गडबड करायची गरज नाही. राजीनामा दिले होते पण अजित पवारांनी स्वीकारले नव्हते. भविष्यात ही बाब चिंताजनक ठरू शकते, भविष्यात सुनेत्रा वहिनी योग्य तो निर्णय घेतील. ज्यांची नाराजगी असेल ती दूर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा देखील मिटकरींनी व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मनोज व्यवहारे (असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष), सुभाष मालपाणी (उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष) आणि सचिन जाधव (मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष) यांनी आपल्या सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिलेला होता. या तिघांनी 26 जानेवारी रोजी पत्र देत आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे सादर केला होता. त्या दिवशी अजित पवार पालकमंत्री म्हणून पुण्यातील पक्ष कार्यालयात गेले होते आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्याच दिवशी या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती.
सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी होती. वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. संघटनात्मक स्तरावर असमानता आणि न्यायाच्या तत्वांचा अभाव असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. वरिष्ठांकडून असहकार्याची भूमिका घेतली जात असल्याने संघटनावाढीला अडथळे येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जबाबदार पदावर राहणे कठीण होत असल्याचे सांगत त्यांनी पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
त्या वेळी अजित पवार यांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते, अशी माहिती समोर आली. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर हेच राजीनामे प्रदेश कार्यालयात पोहोचले आणि कोणतंही कारण न विचारता ते मंजूर करण्यात आले. त्यामुळे पक्षात अचानक झालेल्या या बदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनील तटकरे पुढील निर्णय काय घेणार?
आता या सर्व घडामोडीनंतर संबंधित विभागांसाठी नवीन नियुक्त्या कोणाच्या नावावर होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुढील निर्णय काय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता पक्षात अनेक घडामोडी घडत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.