खराब फॉर्म विसरा, आता आक्रमक खेळा! आशिया कपपूर्वी हेडकोच मजूमदारांचा खेळाडूंना स्पष्ट संदेश

भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघाच्या अलीकडील खराब कामगिरीकडे फारसे लक्ष न देता, युवा संघाला आक्रमक क्रिकेट खेळण्याची आणि पुढील सहा महिन्यांसाठी भक्कम पाया रचण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. या दरम्यान भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतही सहभागी होणार आहे.
भारताने यावर्षी खेळलेल्या 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी नऊ सामने गमावले आहेत. परदेशातील दौरे आणि प्रमुख स्पर्धांमध्ये संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. आता भारत आज रविवारी महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेत थायलंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यास सज्ज आहे.
मुजुमदार यांनी सांगितले की, संघाने जुन्या कामगिरीचा विचार करत बसण्यापेक्षा सुधारणेच्या संधींवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “हा एक युवा संघ आहे आणि यात सुधारणेला भरपूर वाव आहे. आम्ही चांगले आणि आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील सहा महिन्यांसाठी दमदार सुरुवात करणे हेच आमचे आताचे ध्येय आहे.”
अमोल मुजुमदार यांच्या मते, दुबईतील उष्ण आणि दमट हवामानात फिरकीपटू (स्पिनर्स) महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी नमूद केले, “संघात विविध प्रकारचे फिरकीपटू आहेत आणि सराव सत्रांदरम्यान आम्ही पाहिले आहे की खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना काही प्रमाणात मदत करते. या फायद्याचा पुरेपूर लाभ घेण्याची आम्हाला आशा आहे.”
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल विचारले असता, मुजुमदार यांनी स्पष्ट केले की सध्या संघाचे संपूर्ण लक्ष केवळ खेळावरच आहे. ते म्हणाले, “खेळाडू मैदानाबाहेरील गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यांचे संपूर्ण लक्ष रविवारी होणाऱ्या सामन्यावर आहे. भारत-पाकिस्तान सामन्याबाबतची चर्चा योग्य वेळी केली जाईल.”
उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे, जेमिमा रॉड्रिग्स महिला टी-20 आशिया चषकासोबतच आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळू शकणार नाही. मजुमदार म्हणाले, “जेमिमा ही संघातील एक महत्त्वाची खेळाडू आहे आणि तिच्या अनुपस्थितीची नक्कीच उणीव भासेल. बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये तिच्या दुखापतीतून सावरण्यावर पूर्ण लक्ष दिले जात आहे. तरीही, तिच्या अनुपस्थितीत संघातील इतर खेळाडूंना संधी मिळेल आणि त्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत चांगली कामगिरी करतील.”
गेल्या वर्षी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने एकदिवसीय (ODI) विश्वचषक जिंकला होता. मात्र, टी20 विश्वचषकही जिंकण्याबाबत संघाकडून मोठ्या अपेक्षा असताना त्यांची कामगिरी निराशाजनक ठरली. परिणामी, भारताला उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारता आली नाही.
टी20 विश्वचषकातील या अपयशानंतर हरमनप्रीत कौरचे नेतृत्व आणि प्रशिक्षक म्हणून अमोल मजुमदार यांची भूमिका यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. तरीही, बीसीसीआयने नेतृत्वाच्या पदांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आता, हरमनप्रीत कौर आणि अमोल मजुमदार यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर पुन्हा एकदा महिला आशिया चषक जिंकण्याची जबाबदारी आहे.
Comments are closed.