आमिर खानच्या ‘त्या’ वक्तव्यावर सोनम वांगचूक यांनी दिली प्रतिक्रिया
लडाखच्या हक्कांसाठी लढणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी अभिनेता आमिर खानच्या एका विधानावर मजेशीर आणि मिश्कील टिप्पणी केली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या 2009 मधील ‘3 इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटातील ‘फुनसुख वांगडू’ हे पात्र वांगचूक यांच्यावर आधारित नव्हते, असा दावा आमिरने नुकताच केला होता. आमिरच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात आमिर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वांगचूक यांना भेटताना दिसत आहे. यावरून वांगचूक यांनी आमिरला त्याच्याच ‘गझनी’ चित्रपटाचा संदर्भ देत टोला लगावला आहे.
प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टवर बोलताना सोनम वांगचूक म्हणाले की, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आमिर त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांचे भाषण ऐकताना दिसत आहे. त्यावेळी तो कदाचित ‘गझनी’ अवतारात असावा, त्यामुळे त्याला 15 मिनिटांनंतर ती भेट विसर पडली असावी असा गमतीशीर टोला त्यांनी लगावला. आमिर पात्रांमध्ये पूर्णपणे एकरूप होतो, त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात भेटून अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली असली, तरी त्याला अल्पकालीन स्मृतीभ्रंश झाला असावा, असे वांगचूक हसत म्हणाले.
मात्र, फुनसुख वांगडू हे पात्र 100 टक्के आपल्यावरच आधारित आहे असा कोणताही दावा त्यांनी केला नाही. कलाकृतींवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो, असे सांगत वांगचूक म्हणाले की, आमच्या भेटीतील काही कल्पना लेखकांपर्यंत पोहोचल्या असाव्यात आणि त्यानुसार पटकथेत बदल झाले असावेत. हे नकळत घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याबाबत आपल्याला कोणतीही तक्रार किंवा अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटात आमिरच्या पात्राची खरी ओळख शेवटी लडाखमधील एक यशस्वी शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ फुनसुख वांगडू अशी होते, जे वांगचूक यांच्या लडाखमधील प्रत्यक्ष कार्याशी तंतोतंत जुळणारे आहे.
Comments are closed.