अमरावतीत हुंडाबळीचा प्रकार? पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने जीवन संपवले

अमरावती : पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच अमरावतीमध्येही तशीच घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात एका 30 वर्षांच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शुभांगी निलेश तायवाडे असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. बँकेत कामाला असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.

शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर शुभांगी ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला. त्यांना एक तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाची मुलगी अशा दोन मुली आहे. लग्नानंतर काही दिवसातच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केले होते. या त्रासामुळेच शुभांगीने आत्महत्या केल्याचा आरोप शुभांगीचे वडील आणि आईने केला आहे.

Shubhangi Taywade Suicide Case : जावयानेच मुलीची हत्या केली, वडिलांचा दावा

शुभांगीचे प्रेत शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत शुभांगीचा लहान भाऊ येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करु नये अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केलेली आहे. आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर निलेशने तिला फासावर लटकवले असा देखील आरोप मृत शुभांगीच्या आईने केला आहे.

Amravati Woman Suicide Case : आठ दिवसांपूर्वी मारहाण

आठ दिवसांपूर्वी आपल्या मुलीला मारहाण करण्यात आली होती. तुमची मुलगी घेऊन जा, मला घटस्फोट द्या असं जावयाने म्हटल्याचं मृत महिलेच्या वडिलांनी सांगितलं. आपली मुलगी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असून ती असं करूच शकत नाही असा दावाही तिच्या वडिलांनी केला. आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर तिला जावयानेच गळफास लावला असा मोठा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास गाडगे नगर पोलिस करत आहेत. मृत शुभांगीचा पती निलेश तायवाडे आणि सासू यांना गाडगे नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

Comments are closed.