अमरोहा हादरले! धार्मिक स्थळाच्या दर्शनाच्या बहाण्याने नेले; 23 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार; CRPF निरीक्षकासह चार जण अटक – TMarathiNews

अमरोहा: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात 23 वर्षीय युवतीवर फार्महाऊसवर कथित सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून हसनपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, त्यामध्ये CRPFचे दोन कर्मचारी आणि उत्तर प्रदेश पोलिसातील दोन कर्मचारी असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना 23 सप्टेंबरच्या मध्यरात्री हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिची सुटका केली. त्यानंतर चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अटक केलेल्यांमध्ये CRPFचा हेड कॉन्स्टेबल मोहित उर्फ विक्की, CRPF निरीक्षक लालाराम यादव, हसनपूर पोलीस ठाण्यातील PSI संजय तोमर आणि हेड कॉन्स्टेबल प्रमोद यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

फार्महाऊसवर नेल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला आरोपींपैकी काहींना पूर्वीपासून ओळखत होती. 22 सप्टेंबर रोजी ती मोहित आणि लालाराम यादव यांच्यासोबत अमरोहा येथे आली होती. त्यानंतर मोहितची संजय तोमर याच्याशी भेट झाली आणि सर्वजण झुलपुरी येथील एका फार्महाऊसवर गेले. तेथे दोन खोल्या भाड्याने घेण्यात आल्याची माहिती आहे.

काही वेळाने हेड कॉन्स्टेबल प्रमोद तेथे पोहोचला. त्यानंतर आपल्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

दरम्यान, एका महिलेवर अत्याचार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री घटनास्थळी पोहोचून पीडितेची सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रत्येक आरोपीची भूमिका तपासणार

अमरोहाचे पोलीस अधीक्षक लखन सिंह यादव यांच्या माहितीनुसार, पीडितेला धार्मिक स्थळाचे दर्शन घडवण्याच्या बहाण्याने मुझफ्फरनगरहून आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रवासादरम्यानही तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

फार्महाऊसवर नेमके काय घडले आणि प्रत्येक आरोपीची या प्रकरणातील भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांसह पीडितेचा जबाब आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. चारही आरोपींना न्यायालयात हजर करून रिमांडची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Comments are closed.