यंदा आनंदाचा शिधा नाहीच, शिवभोजन योजनेतही मोठी कपात, ऐन सणासुदीच्या काळातच गरिबांवर संकट
Anandacha Shidha : अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) यंदा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) सरकारवर ताण येत असल्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही. त्याचा परिणाम म्हणून आनंदाच्या शिधा योजनेला यंदा ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) या स्वस्तात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही काटकसर करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.
यंदा दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वितरित केला जाणार नाही. यंदा हा शिधा मिळणार नसल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासोबतच, ‘शिवभोजन थाळी’ या स्वस्त दरात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही यंदा काटकसर करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवभोजन योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सुमारे 60 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाला केवळ 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर ताण येत असल्याची माहिती समोर आली आहे.
आनंदचा शिधा’ योजना नेमकी काय?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली. 2022 च्या दिवाळीला पहिल्यांदा ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण करण्यात आले, ज्यात एक किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता. तो लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयांत वितरित केला जातो. 2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने, तसेच 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण केले होते.
‘शिवभोजन थाळी’वरही कपात
‘शिवभोजन थाळी’साठी यापूर्वी 60 कोटी रुपयांची तरतूद होती, ती आता फक्त 20 कोटी रुपयांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे थाळ्यांची संख्याही वाढणार नाही. बजेट कपात झाल्याने शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राज्याच्या आर्थिक अडचणीमुळे केवळ ‘आनंदाचा शिधा’ नव्हे, तर इतरही अनेक सामाजिक योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना दिलासा देणाऱ्या या योजनांमध्ये कपात झाल्याने सामान्य जनतेवर त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=smnm-amzq-8
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.