योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी अनिल परब इरेला पेटले, घायवळच्या रिव्हॉल्व्हर लायसन्सची क्रोनोलॉज


Anil Parab & Yogesh Kadam: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. सचिन घायवळ (Sachin Ghaywal) शस्त्र परवाना प्रकरणावरुन गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान उठवत योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली. अनिल परब यांनी योगेश कदमांनी कशाप्रकारे नियम डावलून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला, याची क्रोनोलॉजी उलगडून सांगितली.

योगेश कदम यांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो, त्यानंतर पोलीस त्याची छाननी करतात. पोलीस संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी आणि त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे या सगळ्याची माहिती घेतात. संबंधित व्यक्तीच्या जीवाला खरोखरच धोका आहे की नाही, हे तपासतात. त्यानंतर पोलिसांना वाटलं तर शस्त्र परवाना दिला जातो. शस्त्र परवाना देताना संबंधित व्यक्तीचे समाजातील स्थानही पाहिले जाते. मात्र, सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पोलिसांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना नाकारला होता. त्यानंतर सचिन घायवळ याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर अपील केले. तेव्हा पोलिसांनी आपली बाजू मांडत सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी योगेश कदम यांना सांगितली. मात्र, योगेश कदम यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले. सचिन घायवळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते 20 वर्षे शाळेत क्रीडा शिक्षक होते. त्यांना या व्यवसायात अनेक स्पर्धक आहेत. त्यांना दररोज मोठ्या रक्कमेची देवाणघेवाण करावी लागते. या कारणामुळे योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर करत असल्याचे म्हटले होते.

पोलीस सचिन घायवळ याच्यासारख्या गुंडांना शस्त्र परवाना मिळू नये, यासाठी प्रयत्न करतात. मात्र, योगेश कदम यांनी पुणे पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला सारुन सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिला. या गोष्टीमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होते. राज्य सरकारमधील हे मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतायत, मुली नाचवून हे लोक भाडं खात आहेत, गँगस्टर लोकांना पोसत आहेत. हे मंत्री गुंडांना अधिकृत शस्त्र परवाना देत आहेत. हे मंत्री दररोज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची काय अडचण आहे की, ते अशा मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून का बसले आहेत?, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला.

Anil Parab: अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

*मी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे… याची हाकालपट्टी करा मागणी करेल… मी अधिवेशनात तर आवाज उठवेल पण शिवसेना रस्त्यावर उतरणार… योगेश कदम यांची हक्कापट्टी करा
*कोणाचाही दबाव असेल आपल्याला आपल्याला जबाबदारीने काम केलं पाहिजे
*गुन्हे नाहीत हा पोलिसांचा रिपोर्ट आहे… पण पोलिसांचा हा सुद्धा रिपोर्ट आहे कीं हा गुंडाचा भाऊ आहे… गुन्हेगारी पार्शवभूमी आहे… गुन्हे त्याच्यावर दाखल होते
*ते पळवाट काढत असतील…पण ती लंगडी पळवाट आहे…हे लंगड समर्थन आहे… सरकारचा नाक कापलं गेलं आहे
*मी लोकायुक्तांकडे जाणार, मी कोर्टात जाणार , पण आधी मुख्यमंत्री यांना चान्स देणार
*योगेश कदम याला कोणी ओळखत नाही पण त्या खुर्चीवर तो बसलाय त्याचा अपमान तो करतोय
* हा अर्थपूर्ण व्यवहार असेल किंवा योगेश कदम घायवळांना माझ्यासाठी काम करा म्हणत असतील

https://www.youtube.com/watch?v=xcloqrrk_bs

आणखी वाचा

रोहित पवारांनी निलेश घायवळचं राजकीय कनेक्शन उलगडून सांगितलं, बड्या नेत्यांची नावं, धक्कादायक गौप्यस्फोट

आणखी वाचा

Comments are closed.