आलिशान कारच्या डॅशबोर्डवर फेकली 500 अन् 200 च्या नोटांची बंडलं; अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा
अंजली दमानिया: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे (Santosh Deshmukh Murder Case) पडसाद राज्यभरात उमटले. यानंतर बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) याने त्याच्या काही साथीरांसह ही मारहाण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत राज्याचं गृहखातं व आमदार धस यांच्यावर निशाणा साधला होता. आता याच भोसलेचा आणखी एक व्हिडीओ अंजली दमानिया यांनी शेअर केला असून यात तो पैशाचे बंडलं कारमध्ये उधळत असल्याचं दिसून आलंय.
अंजली दमानिया यांनी मारहाणीचा व्हिडीओ शेअर करत सरकारला सवाल विचारले होते. हे काय आहे काय? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पाहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते.
हाच तो सतीश भोसले ?
कोण आहे हा ? कुठून आले एवढे पैसे? अटक करा ह्या माणसाला pic.twitter.com/vi53uraer7
– श्रीमती अंजली दमानिया (@अंजली_डमानिया) 6 मार्च, 2025
अटक करा या माणसाला : अंजली दमानिया
आता अंजली दमानिया यांनी आणखी एक व्हिडिओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. या व्हिडीओत सतीश भोसले हा नोटांची बंडलं दाखवत आहे. काही वेळानंतर नोटांची बंडलं हे कारच्या डॅशबोर्डवर फेकत होता. यात 500 रुपयांची बंडलं दिसत आहे. त्यानंतर एक 200 रुपयांच्या नोटाचं बंडलं डॅशबोर्डवर फेकून मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अंजली दमानिया यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, हाच तो सतीश भोसले? कोण आहे हा? कुठून आले एवढे पैसे? अटक करा या माणसाला, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलंय की, हो, सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. त्याचा मारहाणीचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ मी पाहिला आहे. त्यानंतर मी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यानंतर मला माहिती मिळाली की ही एका साखर कारखान्याच्या परिसरात घडलेली घटना आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर ती घटना घडली होती. ती दिड वर्षांपूर्वीची घटना आहे. मात्र या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यानंतर मी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की, मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.