अन्नामलाई नवीन चळवळ सुरू करणार.
भाजप सदस्यत्वाचा केला त्याग, कामाला लागणार
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूतील भारतीय जनता पक्षाचे नेते के. अण्णामलाई यांनी आता भारतीय जनता पक्षाचा त्याग केला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपविले आहे. आपण तामिळनाडूत लवकरच एक राजकीय चळवळ हाती घेणार असून येत्या आठ ते दहा महिन्यांमध्ये तिचे स्वरुप स्पष्ट होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. आगामी लोकसभा निवडणूकही लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके हा नवा पक्ष सत्तेवर आला आहे. दोन्ही द्रविडी पक्षांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत अद्रमुकशी युती केली होती. मात्र, या युतीला अण्णामलाई यांचा विरोध होता. भारतीय जनता पक्षाने स्वतंत्ररित्या निवडणुकीत सहभागी व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आता ही निवडणूक झाल्यानंतर एक महिन्याने त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला असून नवा तामिळी पक्ष स्थापन करण्याचा संकेत दिला आहे. तामिळनाडूत विकासाभिमुख आणि संस्कृती आधारीत राजकीय संस्कृती निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासंबंधी आदर
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याविषयी आपल्याला नितांत आदर आहे, असे अण्णामलाई यांनी त्यांच्या त्यागपत्रात स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षावर मी आपल्या इच्छांचे ओझे यापुढे लादू इच्छित नाही. त्यामुळे मी वेगळा मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रस्थापित राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे. व्यवस्थेत परिवर्तन घडावे अशी तिची इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मी योजिलेले आहे, अशा अर्थाची मांडणी त्यांनी त्यांच्या त्यागपत्रात केली आहे.
राष्ट्रीय पक्षांसंबंधी मते
आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने तामिळनाडूत येथील जनतेला समजेल अशी भाषा केलेली नाही. त्यामुळे हे पक्ष येथील जनतेशी स्वत:ला जोडून घेण्यात अपयशी ठरले आहेत. समर्थ आणि एकात्म भारताची उभारणी त्यातील विविध विभागीय अस्मिता आणि आकांक्षांच्या पूर्तीमुळे होणार आहे. मी त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे, असे अण्णामलाई यांनी आपल्या त्यागपत्रात पुढे स्पष्ट केलेले आहे.
ही हानी नव्हे
के. अण्णामलाई यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग केलेला असला, तरी या घटनेचा कोणत्याही विपरीत परिणाम भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडूतील भवितव्यावर होणार नाही. त्यांचा पक्षत्याग ही भारतीय जनता पक्षाची हानी नाही. हा पक्षासाठी कोणत्याही प्रकारचा मोठा धक्का नाही, अशी प्रतिक्रिया तामिळनाडू भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे अध्यक्ष नयनार नागेंद्रन यांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.