राज्यसभा निवडणुकीची घोषणा
दहा राज्यांच्या 24 जागांसाठी 18 जूनला मतदान : महाराष्ट्र-तामिळनाडूत प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या जागांसाठी 18 जूनला मतदान घेण्यात येणार आहे. निधर्मी जनता दलाचे एच. डी. देवेगौडा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते दिग्विजयसिंग यांचा राज्यसभा कार्यकाळ आता संपत आला आहे. त्यांच्या स्थानांवरही निवडणूक घेतली जाणार आहे.
आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमधील प्रत्येकी चार जागा, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील प्रत्येकी 3 जागा, झारखंड राज्यातील 2 जागा, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमधील प्रत्येकी एक जागा अशा 24 जागांसाठी राज्यसभेची ही निवडणूक होणार आहे.
मंत्र्यांचाही कार्यकाळ संपणार
केंद्रीय मंत्री रवनीतसिंग बिट्ठू (राजस्थान) आणि जॉर्ज कुरियन (मध्यप्रदेश) यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधीही संपत आला आहे. तसेच गुजरातमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहील यांचा कार्यकाळही आता काही दिवसांमध्ये संपणार आहे. या एकंदर 24 जागांसमवेत महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये राज्यसभेच्या प्रत्येकी एका पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचे सदस्यत्व सोडल्याने त्या जागी पोटनिवडणूक होणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली.
राज्यसभेतील बदलती समीकरणे
काही काळापूर्वी आम आदमी पक्षाच्या 10 राज्यसभा सदस्यांपैकी 7 सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाची संख्या आता केवळ 3 राहिली आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा सदस्यांची संख्या 113 झाली आहे. नव्या निवडणुकांनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्यसभेत आणखी बळकट होणार, हे आकडेवारीवरुन स्पष्ट दिसून येत आहे.
रालोआची स्थिती भक्कम
ज्या 10 राज्यांमध्ये राज्यसभा निवडणूक होणार आहे, त्यांच्यापैकी कर्नाटक (4 जागा) आणि झारखंड (2 जागा) वगळता इतर सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष यांचीच सरकारे आहेत. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची संख्या या निवडणुकीनंतर सभागृहात आणखी वाढणार आहे.
राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम
ड 1 जून 2026 : निवडणुकीची अधिसूचना घोषित होणार
ड 8 जून 2026 : उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस
ड 9 जून 2026 : उमेदवारी अर्जांची छाननी करण्याचा दिवस
ड 11 जून 2026 : अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस
ड 18 जून 2026 : सर्व जागांसाठीच्या मतदानाचा दिवस
ड 18 जून 2026 : संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतगणना
Comments are closed.