तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का.

कोयल मलिक यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सहन कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर सातत्याने धक्के खात असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आणखी एक हादरा बसला आहे. या पक्षाच्या राज्यसभा सदस्या आणि अभिनेत्या कोयल मलिक यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग केला आहे. त्यांनी आपले त्यागपत्र देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे गुरुवारी सकाळी सुपूर्द केले. त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या तीन राज्यसभा सदस्यांनी पदत्याग केला होता. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या नात्याने निवडणुकीत सहभाग घेतला होता. आता ते या पक्षाचे राज्यसभा सदस्य झाले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून कोयल मलिक यांनीही राज्यसभा सदस्यत्व सोडले आहे.

पराभवानंतर अस्तित्वाचा प्रश्न

पश्चिम बंगाल विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस पक्षाचा प्रचंड पराभव झाला होता. या पक्षाला विधानसभेतील 294 जागांपैकी केवळ 80 जागा मिळाल्या. तर भारतीय जनता पक्षाला 207 जागांचा घसघशीत लाभ झाला. तेव्हापासून तृणमूल काँग्रेस पक्षाला फुटीचे ग्रहण लागले आहे. प्रथम पक्षाच्या 80 पैकी 60 विधानसभा सदस्यांनी वेगळा गट स्थापन केला. आता या गटाने आपलाच तृणमूल काँग्रेस पक्ष खरा असल्याचे प्रतिपादन करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांच्यावर अधिकार सांगितला आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या 28 लोकसभा सदस्यांपैकी 20 लोकसभा सदस्यांनी ‘नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (एनसीपीआय) या पक्षात प्रवेश करुन केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समर्थन दिले आहे. त्यानंतर, तीन आणि आता आणखी एक असे चार राज्यसभा सदस्य बाहेर पडले आहेत. ममता बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार मदन मित्रा यांनीही बुधवारी स्वतंत्र गटात प्रवेश केला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसची 440 कोटी रुपयांची बँकेतील संपत्तीही आता गोठविण्यात आली आहे. पक्षाला भविष्यकाळात आणखी गळती लागण्याची शक्यताही राजकीय तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

पुन्हा पक्ष उभा करणार

पक्षातून कितीही लोक बाहेर पडले, तरी आपण पुन्हा तृणमूल काँग्रेसची उभारणी करु, असे प्रतिपादन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. आपल्या पक्षाला कोणी संपवू शकत नाहीत. कितीही संकटे आली, तरी आम्ही मागे हटणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले असून भाचा अभिषेक बॅनर्जी याची पाठराखण केली.

Comments are closed.