वगळलेल्या मतदारांना आणखी एक संधी

► निवडणूक आयोगाकडून संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट, सकारात्मक निर्णय घेतल्याचा अनेकांना लाभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान (एसआयआर) मसुदा मतदारयादीत समाविष्ट नसलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारांना गणना अर्ज देण्यात आले होते, परंतु अनुपस्थिती, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणीमुळे नावे मसुदा मतदारयादीत समाविष्ट होऊ न शकलेल्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. सदर वगळलेल्या मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी आयोगाने एक नवीन प्रणाली स्थापित केली आहे. शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत.

पात्र असूनही अनुपस्थिती, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणीमुळे यादीतून वगळलेल्या मतदारांची नावे नोंदवण्यासाठी ही संधी देण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या प्रक्रियेला गती आणण्यासाठी बूथनिहाय याद्या तयार करून संबंधित मतदान केंद्रांवर, तसेच पंचायत भवन, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालये आणि गट विकास अधिकारी कार्यालयांमध्ये प्रदर्शित केल्या जाणार आहेत. या याद्या आयोगाच्या वेबसाइटवर पीडीएफ स्वरूपातही उपलब्ध करून दिल्या जातील. त्यात नाव वगळण्यामागील संभाव्य कारणे स्पष्ट केली जातील. ह्या याद्या पाहून संबंधित मतदार आपले नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागू शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया स्पष्ट

ज्या मतदारांची नावे ‘एसडीडी’ प्रवर्गात सूचीबद्ध आहेत, त्यांना त्यांचे गणना अर्ज पुन्हा सादर करण्याची संधी मिळेल. अर्ज अपूर्ण असलेल्यांसाठीही नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. सदर अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या डॅशबोर्डवर पुन्हा तयार केले जातील. बूथ स्तरावरील अधिकारी (बीएलओ) मतदारांना अर्ज वितरित करण्यासाठी घरोघरी जातील आणि राजकीय पक्षांच्या बूथ-स्तरीय एजंटांचीही मदत घेतील. या प्रक्रियेसाठी व्हॉट्सअॅप, ईमेल आणि एसएमएसद्वारे देखील अर्ज किंवा विनंती स्वीकारली जाऊ शकते. मतदार आपला जुना ईपीआयसी क्रमांक वापरून वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करून भरू शकतात.

पूर्वीचा पत्ता कायम असल्यास काय करावे?

जे मतदार त्यांच्या जुन्या पत्त्यावरच राहतात, त्यांच्यासाठी आयोगाने एक वेगळी प्रक्रिया स्थापित केली आहे. सदर व्यक्तींनी पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला गणना अर्ज, तसेच पूर्वी अर्ज का सादर केला नाही याचे स्पष्टीकरण सादर करणे आवश्यक आहे. आयोगाने यासाठी एक नमुना परिशिष्ट ‘ब’ मध्ये दिला आहे. मतदार हा अर्ज संबंधित ईआरओ, सहाय्यक ईआरओ किंवा बीएलओ यांच्याकडे स्वत: किंवा कुटुंबातील सदस्यामार्फत सादर करू शकतात. तो ‘ईसीआयनेट’वर ई-स्वाक्षरीसह देखील सादर केला जाऊ शकतो.

राज्यातच स्थलांतरित झाल्यास काय करावे?

राज्यांतर्गत आपला पत्ता बदलणाऱ्या मतदाराने परिशिष्ट ‘क’ मध्ये नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघ नमूद करणे आवश्यक आहे. फॉर्म आणि घोषणापत्रावर मतदाराची किंवा कुटुंबातील सदस्याची सही आवश्यक असेल. नवीन पत्ता सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे आवश्यक असतील. अशा मतदारांना फॉर्म 8 भरण्याची आवश्यकता नाही. बेघर मतदारांच्या बाबतीत बीएलओचा क्षेत्रीय पडताळणी अहवाल पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारला जाईल.

निवडणूक अधिकाऱ्यांना आयोगाकडून सूचना

वगळलेल्या मतदारांकडून प्राप्त झालेले सर्व फॉर्म्स आणि त्यासोबतची घोषणापत्रे नियमांनुसार तपासली जावीत, असे आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. निवडणूक नोंदणी अधिकारी मतदाराची अचूक पात्रता, निवासाचे ठिकाण आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करतील. स्वीकारलेले फॉर्म्स अंतिम मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी बाजूला ठेवले जातील. या प्रक्रियेत मतदाराचा जुना ईपीआयसी क्रमांक कायम राहील. मात्र, एसआयआरदरम्यान नवीन नोंदणीसाठी फॉर्म 6 आधीच सादर केलेल्यांना फेरगणनेचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या अर्जांवर आयोगाच्या 3 नोव्हेंबर 2026 रोजीच्या निर्देशांनुसार प्रक्रिया केली जाईल. आयोगाने सर्व अधिक्रायांना या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे, त्यांचा व्यापक प्रचार करण्याचे आणि कोणताही पात्र मतदार नोंदणीच्या संधीपासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments are closed.