जंतरमंतरवर आरक्षण विरोधी आंदोलन
पोलिसांनी अनुमती नाकारल्यानंतरही जमले लोक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जंतर-मंतरवर नीट-युजी प्रश्नपत्रिकाफुटीविरोधातील आंदोलन झाल्यानंतर आता ‘आरक्षण हटाव’ आंदोलनाचा प्रारंभ झाला आहे. आरक्षण विरोधी आंदोलकांचा जमाव येथे जमला असून त्यांनी आरक्षण रद्द करा, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या आंदोलकांना जंतर-मंतरवर जमण्यास अनुमती नाकारली आहे. त्यांना रामलीला मैदानावर आंदोलन करण्याची सूचना करण्यात आली आहे, तरीही हे आंदोलन याच स्थानी जमले आहेत. हे आंदोलन अनिश्चित कालावधीचे आहे. आरक्षण हटाव आंदोलनासाठी रीतसर अनुमती मागण्यात आली होती. पोलिसांनी ती दिलेलीही आहे. तथापि, रामलीला मैदानावर आंदोलन केले जावे आणि आंदोलकांची संख्या 500 हून अधिक असू नये, अशा अटी पोलिसांनी अनुमती देताना लेखी स्वरुपात स्पष्ट केल्या आहेत. तरीही हे आंदोलन जंतर-मंतरवर पेले जात आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंतच आंदोलन करण्याला अनुमती असतानाही अद्याप तेथे आंदोलकांचा जमाव असल्याचे दिसून येत आहे.
आरक्षण हटाव आंदोलन काय आहे…
या आंदोलनाचा प्रारंभ प्रथम सोशल मिडियावर करण्यात आला. इन्स्टाग्रामवर एक प्लॅटफॉर्म उघडण्यात आला आणि लोकांची मते मागविण्यात आली. सध्या या आंदोलनाचे ऑन लाईन पाठीराखे साधारणत 50 लाख आहेत. त्यांच्यापैकी काही दिल्लीच्या जंतर-मंतरवर प्रत्यक्ष जमून आंदोलन करीत आहेत. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण यांच्यातील आरक्षण हटवून गुणवत्ता आधारीत व्यवस्था निर्माण केली जावी, अशी या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. सध्याच्या जातीआधारित आरक्षणामुळे जातींजातींमधील भेद अधिक तीव्र बनला आहे. जात व्यवस्था नाहीशी व्हायची असेल, तर जातींच्या आधारावरचे आरक्षण दूर केले पाहिजे. सर्व जातींमधील गुणवान व्यक्तींना संधी मिळाली पाहिजे. गुणवत्ता हाच नोकरी आणि शिक्षणाचा पाया असला पाहिजे, अशा विविध मागण्या या आंदोलकांच्या आहेत.
सीजेपीच्या धरतीवर आंदोलन
सीजेपी या संघटनेने ज्या प्रमाणे प्रथम इन्स्टाग्रामवर आंदोलनाचा प्रारंभ केला आणि नंतर नीट-युजी प्रश्नपत्रिकाफुटीच्या प्रश्नावर प्रत्यक्ष आंदोलन जंतर-मंतरवर केले. त्याचे प्रमाणे आरक्षण हटाव आंदोलनाचेही स्वरुप आहे. या आंदोलनाचा कोणीही नेता नाही किंवा मध्यवर्ती नेतृत्व नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
Comments are closed.