अखेर भुयारी मेट्रो मार्गिकेत मोबाईल नेटवर्क सेवा सुरू; एअरटेल, वोडाफोन-आयडिया, जिओ कंपनी ऑक्टिव्ह मोडवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या पोटातून धावणाऱया भुयारी मेट्रो-3 मार्गिकेत अखेर मोबाईल नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. सध्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या दोन कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क उपलब्ध केले असून जिओ कंपनीही ऑक्टिव्ह मोडवर आली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क सुरू होणार आहे.

आरे जेव्हीएलआर ते कफ परेडदरम्यान धावणाऱया मुंबई मेट्रो-3 म्हणजेच ‘ऍक्वा लाइन’ मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. आपत्कालीन स्थितीत मेट्रो प्रवाशांचा बाहेरील लोकांशी संपर्क होत नव्हता. या गैरसोयीच्या मुद्दय़ावर प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर मोबाईल नेटवर्क सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यानुसार एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि जिओ या कंपन्यांनी भुयारी मेट्रो मार्गिकेत प्रत्यक्ष मोबाईल नेटवर्क सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे.

विद्यार्थ्यांना 25 टक्क्यांची सवलत

भुयारी मेट्रो-3 मार्गिकेवर प्रवास करणाऱया 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांप्रमाणे पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनाही तिकीट दरात 25 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. मुंबईतील मान्यताप्राप्त शाळा आणि महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना एनसीएमसी कार्डद्वारे सवलतीचा लाभ घेता येईल. भुयारी मेट्रो मार्गिकेवरील प्रवासादरम्यान तिकिटासाठी 10 ते 70 रुपये मोजावे लागतात. या तिकीटाचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडू नये, या दृष्टीने मुंबई मेट्रोने 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी सवलत आता पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केली आहे. ‘मेट्रो कनेक्ट 3’ ऍप आणि एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 45 आणि 60 फेऱयांचा पासवर सवलतीचा फायदा घेता येणार आहे.

Comments are closed.