तुम्ही देशाचे मुख्य पुजारी आहात का?
शबरीमला प्रकरणी याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिलांच्या धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशाशी निगडित महत्त्वपूर्ण प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. न्यायालयाने शबरीमला वादात याचिका दाखल करणाऱ्या इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनला कठोर शब्दांत फटकारले. 2006 मध्ये दाखल जनहित याचिका म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचे म्हणत न्यायालयाने याचिका का दाखल केली? तुम्ही देशाचे मुख्य पुजारी आहात का असे प्रश्न याचिकाकर्त्याला विचारले आहेत.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने ही टिप्पणी केली आहे. या घटनापीठात न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना, एम.एम. सुंदरेश, अहसानुद्दीन अमानुल्लाह, अरविंद कुमार, ऑगस्टीन जॉर्ज मसीह, प्रसन्ना बी. वराले, आर. महादेवन आणि जॉयमाल्या बागची यांचा समावेश आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्या संघटनेचा हेतू आणि अधिकारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. कुठलीही कायदेशीर संस्था वैयक्तिक श्रद्धेचा दावा करू शकत नाही. विश्वास व्यक्तीचा असतो, संस्थेचा नाही, तुमच्याकडे कुठलाच अंतरात्मा नाही अशी टिप्पणी न्यायाधीश नागरत्ना यांनी केली आहे. याचिका दाखल करण्यासाठी कुठला औपचारिक प्रस्ताव संमत करण्यात आला होता का आणि संघटनेच्या अध्यक्षाने याकरता मंजुरी दिली होती का असे प्रश्न न्यायाधीश अरविंद कुमार यांनी उपस्थित केले.
अशाप्रकारच्या याचिका दाखल करण्याऐवजी संघटनेने बार आणि युवा वकिलांच्या हितासाठी काम करावे अशी तीव्र टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली आहे. ग्रामीण क्षेत्रांमधून येणाऱ्या प्रतिभावंत युवा वकिलांना सहकार्य करणे आणि त्यांच्यासाठी संधी निर्माण करण्याच्या दिशेने काम करणे अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे न्यायाधीश नागरत्ना यांनी म्हटले.
याचिकाकर्त्याचा युक्तिवाद
2006 मध्ये प्रकाशित 4 वृत्तअहवालांच्या आधारावर ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. भगवान अयप्पांच्या भक्तांच्या श्ा़dरद्धेला आव्हान देणे नव्हे तर ती कायम राखणे हा संघटनेचा उद्देश होता असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित वकील रवि प्रकाश गुप्ता यांनी सुनावणीवेळी केला. कमी वयाच्या महिलांचा प्रवेश देवतेच्या इच्छेविरोधात असल्याचे मत मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने यापूर्वीच व्यक्त केले असल्याचेही गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिले.
Comments are closed.