लष्कर 200 K-9 वज्र तोफा खरेदी करणार आहे.

23 हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठरणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय सैन्याची शक्ती मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणाऱ्या दुहेरी आव्हानांदरम्यान भारतीय सैन्य 300 हून अधिक के-9 वज्र सेल्फ-प्रोपेल हॉवित्झर तोफा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावाचे अनुमानित मूल्य सुमारे 23 हजार कोटी रुपये असणार आहे. हा प्रस्ताव लवकरच संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविला जाऊ शकतो.

चालू आठवड्यात हा प्रस्ताव संरक्षण खरेदी बोर्डासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास या तोफांच्या निर्मितीची जबाबदारी लार्सन अँड टुब्रो कंपनीला मिळणार आहे. भारताच्या संरक्षण इतिहासाच्या सर्वात मोठ्या तोफखाना खरेदी व्यवहारांपैकी हा एक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

भारतात होणार उत्पादन

एलअँडटी ही दक्षिण कोरियातील संरक्षण कंपनी हनव्हा एअरोस्पेसोबत तांत्रिक भागीदारीच्या अंतर्गत के-9 वज्रचे उत्पादन भारतात करत आहे. या तोफांमुळे सैन्याचे सामर्थ्य वाढण्यासोबत ‘मेक इन इंडिया’ आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अभियानालाही मजबुती मिळणार आहे.

500 पार पोहोचणार संख्या

या नव्या ऑर्डरनंतर भारतीय सैन्याच्या ताफ्यात अन् ऑर्डरमध्ये सामील के-9 वज्र तोफांची एकूण संख्या 500 हून अधिक होणार आहे. इतक्या मोठ्या संख्येत आधुनिक सेल्फ-प्रोपेल तोफा तैनात होणार असल्याने भारताच्या आर्टिलरीच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

यापूर्वीही खरेदी

भारताने 2017 मध्ये सुमारे 4500 कोटी रुपयांच्या निधीतून 100 के-9 वज्र तोफांची पहिली ऑर्डर दिली होती. त्यांची डिलिव्हरी 2021 मध्ये निश्चित मुदतीपूर्वी पूर्ण झाली होती. प्रारंभी या तोफांना राजस्थान आणि गुजरातच्या वाळवंटी भागांमध्ये तैनात करण्यात आले होते. यानंतर डिसेंबर 2023 मध्ये सुमारे 7600 कोटी रुपयांच्या निधीतून आणखी 100 तोफांची ऑर्डर देण्यात आली होती.

 

Comments are closed.