तुम्ही 'हॅलो' म्हणताच कॉल डिस्कनेक्ट झाला तर…
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून इशारा जारी : अशाप्रकारच्या कॉलकडे दुर्लक्ष करण्याची सूचना : असू शकतो स्कॅम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एखाद्या अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यास आणि तुम्ही तो स्वीकारत ‘हॅलो’ बोलल्यावर अचानक कॉल कट झाल्याचा प्रकार सध्या अनेकांसोबत घडत आहे. अनेकदा आम्ही याकडे नेटवर्कची समस्या किंवा राँग नंबर समजून दुर्लक्ष करत असतो. परंतु याप्रकरणी आता सावध होण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात हा एक नव्या प्रकारचा सायबर फ्रॉड असून ज्याला ‘सायलेंट कॉल स्कॅम’ म्हटले जात आहे.
सायलेंट कॉल स्कॅम काही साधारण कॉल नव्हे तर हॅकर्सद्वारे वापरण्यात येणारे एक ऑटोमेटेड सिस्टीम (कॉम्प्युटराइज्ड मशीन) आहे. स्कॅमर्स एकाचवेळी हजारो क्रमांकावर कॉल करतात. या कॉलचा उद्देश लोकांसोबत संभाषण करणे नसतो, तर संबंधित क्रमांक सक्रीय आहे की नाही हे तपासणे स्कॅमर्सचा उद्देश असतो. समोरच्या व्यक्तीने कॉल घेत ‘हॅलो’ म्हटल्यावर मशीन त्याचा आवाज ओळखते आणि खरा माणूस बोलतोय की नाही हे पडताळते. यानंतर त्वरित तो कॉल कट होतो आणि संबंधिताचा क्रमांक स्कॅमर्सच्या ‘अॅक्टिव्ह नंबर्स’च्या यादीत सेव होत असतो.
सायबर दोस्तचा इशारा
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी सायबर सुरक्षा एजेसी 14सी चे सायबर दोस्तने या स्कॅमवरून अलर्ट जारी केला आहे. एजेन्सीनुसार संबंधितांचा क्रमांक सक्रीय असल्याचे स्कॅमर्सना कळल्यावर खरा फ्रॉड सुरू होत असतो.
-संबंधित संपर्क क्रमांकावर सायबर स्कॅमयुक्त कॉल्सचा जणू पूर येऊ शकतो.
-स्कॅमर्स तुम्हाला घाबरवून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचा प्रयत्न करू शकतात.
-बँक खात्याची माहिती चोरणे किंवा लॉटरीच्या नावावर फसवणुकीसाठी टार्गेट केले जाऊ शकते.
सायलेंट कॉल स्कॅमपासून कसे वाचावे?
सायबर ठगांपासून वाचण्यासाठी लोकांनी काही सोप्या परंतु आवश्यक गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पुन्हा कॉल न करणे : कॉल स्वीकारताच तो कट झाल्यास त्या अनोळखी क्रमांकावर पुन्हा कॉल करण्याची चूक कदापिही करू नका.
नंबर ब्लॉक करा : एकाच अनोळखी क्रमांकावरून पुन्हा पुन्हा कॉल येत असल्यास तो क्रमांक त्वरित ब्लॉक करून टाकण्यात यावा.
स्पॅम अलर्टवर लक्ष द्या : दूरसंचार कंपन्या आता कॉल आल्यास स्क्रीनवर ‘स्पॅम’ किंवा ‘सस्पेक्टेड स्पॅम’ असा अलर्ट देतात, अशाप्रकारचे कॉल स्वीकारू नये.
खासगी माहिती देऊ नका : कुठल्याही अनोळखी कॉल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपवर आलेल्या लिंकला क्लिक करू नका. वैयक्तिक किंवा बॅकिंग तपशील कधीच शेअर करू नका.
कोणते पाऊल उचलावे ?
वारंवार अशाप्रकारचे कॉल येत असल्यास त्वरित पाऊल उचलावे. संशयास्पद क्रमांकाला एनसीआरपी पोर्टलमध्ये ‘चेक अँड रिपोर्ट’वर नमूद करावे.
स्कॅम झाल्यास काय करावे?
जर तुम्ही किंवा ओळखीचा व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या स्कॅमचा शिकार ठरल्यास ‘सायबरक्राइम डॉट गोव्ह डॉट इन’वर त्वरित तक्रार नोंदवा किंवा 1930 क्रमांकावर कॉल करावा.
Comments are closed.