साहित्यविश्व -कितीदा तुला सांगितले…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

कितीदा तुला सांगितले…
कितीदा तुला सांगितले
वळचणीपाशी उभी राहू नकोस रात्रीची
माझ्या अंगणात पागोळ्या टपटपताना
तू येऊ नकोस जवळपास
हे पावसाळी उत्तररात्रींचे प्रहर
त्यांचा कहर तरी किती
आधी झोप मोडतात मग भलभलते भास, फुलांचे वास
आता स्वप्नही पडणार नसते
मग कुणी झोपावेच कशासाठी?
डोळे टक्क पहात राहतात
खिडकीशी अंधारावर पडलेली तुझी सावली
पहाटे तापलेल्या कपाळावर
तुझा मऊ तळवा तू ठेऊ नकोस

वसंत बापटांच्या ‘मानसी’ या मालिका कविता या पुस्तकातली ही 20 क्रमांकाची प्रेमकविता. खरे म्हणजे विरह कविता. या संग्रहाच्या सुरुवातीच्या मनोगतात बापट म्हणतात, “आपल्या परीने स्वतंत्र असलेल्या छत्तीस कवितांनी सफळ संपूर्ण केलेली ही एक कविता आहे.’’ आपल्या परीने स्वतंत्र असल्यामुळेच ही कविता आपल्याला पूर्ण कविता वाचल्याचा अनुभव देते.
कवितेचा वाच्यार्थ अगदी सरळ आहे. ती त्याला दुरावली आहे. वास्तवात नाही पण त्याच्या मनात, भासात ती सतत आहे. म्हणूनच ती आल्याचा भास त्याला होतोय. कधी? तिने येण्याची वेळ अचूक साधली आहे. ‘पावसाळी उत्तररात्रीचा प्रहर!’ या अशा पावसात विरह व्यथा अधिक तीव्र होते. ‘सावन जो अगन लगाये’ अशी. पावसाळी रात्री कहर करणाऱया असतात. का… तर त्या एकटे असताना अधिक एकटा करतात. जिवाची तगमग होते मग.
आधी झोप मोडतात
मग भलभलते भास, फुलांचे वास…
‘वास’ या शब्दापुढे आलेली टिंबे सांगतात फुलांच्या वासासारख्या अनेक तरल, सुगंधी गोष्टी. भलभलते भास ही शब्दसंहतीसुद्धा प्रेमीजनांच्या जवळीकीच्या आणि स्पर्शाच्या उत्सवाच्या कहाण्या सांगते. पण त्या पाठोपाठ एक न सांगितलेला म्हणजे शब्दांत न सांगितलेला एक निश्वास ऐकू येतो…कारण पुढची ओळ!
आता स्वप्नही पडणार नसते
मग कुणी झोपावेच कशासाठी?
स्वप्नांची जादू अविनाशी असते. निदान आभासात रमण्याची मुभा तिथे असते, पण आता तर स्वप्नही पडणार नसते. नसते हे क्रियापद सांगते की असाच अनुभव त्याला यापूर्वीही आलेला आहे. अशी ‘जाग’ आली की झोप उडतेच. झोप नाही तर स्वप्नं कुठून? म्हणजे ती वास्तवात नाही तरी स्वप्नात भेटण्याची संधी, शक्यताही आता उरली नाही.
पावसाची झड येऊन गेली आहे, आता अंगणात फक्त पागोळ्यांची टपटप आहे.
जशा तिच्या आठवणी. भेटण्याच्या धुवाधार बरसाती ओसरून उरली आहे फक्त पागोळ्यांची टपटप. ती येत नाही. येण्याची शक्यताही नाही आणि तिच्या आठवणी सरत नाहीत. अशी जीवघेणी अवस्था…
त्याचा तिच्याशी चाललेला एकतर्फी संवाद आहे. ती आसपास नाहीच आणि कदाचित इथून पुढे कधीच नसणार. ‘आता स्वप्नही पडणार नसते’ या ओळीतून ते हलकेच समजते.
डोळे टक्क पहात राहतात
खिडकीशी अंधारावर पडलेली तुझी सावली
त्याचे डोळे, त्याच्या संवेदना किती तल्लख आहेत पहा की त्याला अंधारावर पडलेली तिची सावलीही दिसतेय. अंधारापासून तिची सावली वेगळी ओळखू येतेय त्याला!
आणि शेवटच्या दोन ओळी म्हणजे पुन्हा स्वप्न की वास्तव, वास्तव की वास्तवाभास यांच्या सीमारेषेवर असलेल्या पहाटे तापलेल्या कपाळावर
तुझा मऊ तळवा तू ठेवू नकोस
हे वास्तव असेल तर सारी कविताच एक अगदी निराळा अर्थ पदरात घालते. ती आहेच…तोही आहेच. ती पहाटेपर्यंत तिथेच आहे आणि त्याच्या तापलेल्या कपाळावर तळवा ठेवण्याची शक्यता आहे. मात्र आता तिने ‘तापलेल्या कपाळावर तिचा मऊ तळवा ठेवू नये…’ का ठेवू नये…त्याचा संयम ढासळेल…म्हणून?
वास्तवाभास असेल तर…तर हे सारे त्याच्या मनाचे विभ्रम. पावसाळी उत्तररात्री तिची इतकी कडकडून आठवण झाली आहे की जणू ती आहेच त्याच्या खिडकीशी. सारे जुने भासांचे धुके घेऊन आणि मग हे सुख कायमचे नाही याची विषण्ण करणारी जाणीव पुन्हा वर येईल म्हणून? ‘मानसी’मधल्या कविता हे असे धुक्याचे आवरण घेऊनच अवतरल्या आहेत. साऱया मिळून एक अधुरी कहाणी सांगतात. चुटपुट लावतात.
[email protected]

Comments are closed.