मंतरंग – तू इतका का हसतोस?

>> दिव्या सौदागर

हल्लीच्या काळात एक मानसशास्त्रीय संज्ञा प्रचलित होते आहे. ती म्हणजे स्माईलिंग डिप्रेशन. तीव्र नैराश्य आलेल्या या मानसिक आजारामध्ये व्यक्ती कायम सुखी, समाधानी आणि आनंदी असल्याचा मुखवटा धारण करते, पण प्रत्यक्षात ती आतून तीव्र अशा नैराश्याच्या गर्तेत असते.

ऋतुजा (नाव बदलले आहे) आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची म्हणून प्रसिद्ध होती. कायम इतरांच्या मदतीला तत्पर, मित्रमैत्रिणींसाठी कायम अव्हेलेबल आणि सदा हसऱ्या चेहऱ्याची अशी ऋतुजा ही ऑफिसमध्येही सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होती. तिचा ऑफिसमध्ये असलेला वावर सुखद असायचाच शिवाय ऑफिसमधला ताणही कमी करायचा. ऑफिसमध्ये नवीन आलेल्या सहकाऱ्यांना काही अडलं तर कुठेही आडपडदा न ठेवता ती मदतीला असायची. वैयक्तिक आयुष्यातही नातेवाईकांमध्ये ती अशीच हसरी होती. त्यामुळे कुठल्याही कार्पामाची शान म्हणून तिला ओळखलं जाई. अशी ही प्रसन्न आणि दिलखुश ऋतुजा जेव्हा एका घरगुती कार्पामामध्ये तिच्या मोठय़ा भावाशी भांडली तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले. कोणीही तिला एवढय़ा चढय़ा आवाजात बोलताना पाहिलं नव्हतं. थोडक्यात सांगायचं तर झालं असं होतं की, ऋतुजाच्या भावाने तिची सगळ्यांसमोर फिरकी घेत म्हटलं की “ऋतुजा ही माझी असिस्टंट आहे” आणि या वाक्यावर ती डिवचली गेली.

समुपदेशन सत्राला ऋतुजा आईबरोबर आली होती. ती आली तेव्हा तिच्या देहबोलीवरून नैराश्याच्या खुणा दिसत होत्या. तिची आई आपल्या मुलीच्या दिसलेल्या या बदललेल्या वर्तनामुळे गोंधळली होती. “ऋतुजा असं काही बोलेल एकदम असं वाटलंच नव्हतं आम्हाला. साखरपुडय़ाला गेलेलो आणि ही सगळी भावंडं एकत्र गप्पा मारत बसली होती. आमची ऋतुजा तर सगळ्यांशी मस्ती करत होती. भावाची आणि तिची कायम आपापसात मस्ती चालते. काल काय एवढं तिला त्याच बोलणं लागलं की, सगळ्यांसमोर मला मृत्यू हवाय असं बोलून गेली.” एवढय़ात आईला मध्येच तोडून ऋतुजा तिच्यावर ओरडली, “मी केवढी त्रासात आहे याचा जरा तरी विचार केलास का? काल मला दादा सगळ्यांसमोर चिडवत होता आणि तुम्ही हसत होतात. माझी घरात किंमत कधी नव्हतीच, पण बाहेरही तुम्ही ठेवली नाही.” असं बोलून ऋतुजा रडायला लागली.

हसरी आणि प्रसन्न चित्तवृत्तीची ऋतुजा या वेळी तप्त गोळ्याप्रमाणे बरसत होती. तिच्या मनातली सगळी खदखद अत्यंत वाईट पद्धतीने बाहेर पडत होती आणि तिची आई अधिकाधिक दुखावली जात होती. तिला ऋतुजाचं हे रूप नवीन होतं. “माझी मुलगी अशी कधीच नव्हती. कायम मोकळी असलेली ही अशी आता का बोलायला लागली आहे?” असं जेव्हा आईने काळजीने विचारलं तेव्हा ऋतुजाने त्वरित उत्तर देत म्हटलं, “मी कायम तुमच्यासमोर हसता मुखवटा घेऊन वावरले आहे आणि आता मला हा मुखवटा सांभाळताना त्रास होतोय. मी मनातून कधीच मेलेली आहे. जी ऋतुजा तुमच्या सगळ्यांसमोर वावरते आहे ती एक रोबोट आहे ज्याला मन नाही. फक्त ती स्वतला चावी देते आणि दिवसभर सगळ्यांसमोर हसते. दाखवते… मी छान आहे, मस्त आहे, पण ही ऋतुजा खरी नाही. ती कधीच गेलीय.”

हल्लीच्या काळात एक मानसशास्त्रीय संज्ञा प्रचलित होते आहे. ती म्हणजे स्माईलिंग डिप्रेशन. हा `तीव्र नैराश्य’ या मानसिक आजाराचा एक भाग आहे. या आजारामध्ये व्यक्ती ही कायम सुखी, समाधानी आणि आनंदी असल्याचा मुखवटा धारण करते. I am cool and ok असं भासवते, पण प्रत्यक्षात ती आतून तीव्र अशा नैराश्याच्या गर्तेत असते. नैराश्यात असताना जाणवणारी काही लक्षणं म्हणजे, भूक आणि झोपेच अनियमित पा, आतून संपल्याची भावना, एकटेपणाची भावना, सतत टोकाचे एकमार्गी आणि नकारात्मक विचार या सगळ्याच्या विळख्यात ती असते, पण बऱ्याचदा ती स्वतला इतरांसमोर व्यक्त होऊ देत नाही. त्याची कारणं ही व्यक्तिसापेक्ष असतात. काही स्माईलिंग डिप्रेशनच्या व्यक्ती या स्वतला नैराश्यात असणं स्वीकारत नाहीत, तर काही व्यक्ती आपल्याला समजून घेणारं कोणी नाही या गैरसमजापोटी स्वतला इतरांसमोर प्रसन्न ठेवतात, पण त्यांचा बुरखा कधीतरी त्यांना डिवचणाऱ्या प्रसंगामुळे गळू शकतो.

ऋतुजाच्या बाबतीत हेच झालं. ती लहानपणापासून स्वतला एकटं समजत होती. कारण तिच्या मते तिची आणि तिच्या भावाची आई-वडिलांकडून तुलना केली गेली होती. त्यातूनच तिच्या आणि भावात, आई-वडिलांमध्ये तिने स्वतच एक गैरसमजाची दरी निर्माण केली. `मी स्वतच स्वतला सांभाळू शकते. कारण मी एकटी आहे’ या अट्टाहासापायी तिने स्वतला एका कोषात ठेवलं. तिची पडती, दुबळी बाजू कोणासमोर आणली नाही, पण आतल्या आत तिला स्वतला काय वाटतं हे समजलं होतं.

ऋतुजाला समुपदेशन करताना तिचे समज, गैरसमज आणि त्यांचा तिच्यावर झालेला दुष्परिणाम या सगळ्या बाबतीत बोलणं गरजेचं होतं. तसंच त्याहीपेक्षा महत्त्वाचं होतं ते म्हणजे तिच्या स्वतच्या नैराश्याशी तिचा स्वतचा सामना करू देणं. त्यासाठी महत्त्वाची पायरी ही होती की, तिने स्वतला ती आहे तशी स्वीकारणं. तरच पुढल्या गोष्टी तिच्यासाठी सोप्प्या होणार होत्या.

साहजिकच ऋतुजाला हे स्वीकारणं जड जात होतं. कारण तिने स्वतला कधी मोकळं होऊ दिलं नव्हतं. तिचा I am
ok les I am not ok पर्यंतचा प्रवास तिच्यासाठी आव्हानात्मक राहिला. कारण तिचे कठोर विचार, घरच्यांनी घेतलेल्या भूमिकांना त्रयस्थपणे बघणं, स्वतला लवचिक ठेवणं यामध्ये स्वतच्या भावनांचे, वर्तनाचे नियोजन या सगळ्या गोष्टी करताना ऋतुजा सुरुवातीला बिचकत होती, घाबरत होती नी मनाने थकतही होती, पण तिला तिच्या घरच्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशनाला साथ दिली. ऋतुजा स्वतच्या प्रसन्नतेच्या बुरख्यामधून बाहेर पडत होती. स्वतच्या भावाशी, आई-वडिलांशी मनमोकळा संवाद साधत होती, तिला वाटणाऱ्या समज-गैरसमजांना संवादातून मोकळी वाट देत होती.

नैराश्य हा एक गंभीर पण बरा होणारा मानसिक आजार आहे. त्यातून बाहेर पडायचं असेल तर तो आधी स्वीकारावा लागतो, पण जर तो स्वीकारला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि तेही बऱ्याच काळापर्यंत सहन करावे लागतात. त्यासाठी स्वीकार, प्रयत्न आणि सहकार्य ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरते.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]

Comments are closed.