गाथेच्या शोधात – तुळजापूर परिसरातील भैरव परंपरा

>> विशाल फुटाणे, [email protected]

महाराष्ट्राच्या गावागावांत विखुरलेली भैरवाची मंदिरे, मूर्ती, शिल्पे आणि लोकपरंपरा या प्रदेशाच्या सांस्कृतिक इतिहासातील एक वेगळे पान उलगडतात.

तुळजाभवानीचे नाव घेतले की, डोळ्यांसमोर उभे राहते ते महाराष्ट्रातील एक जागृत शक्तिपीठ. लाखो भाविकांची कुलस्वामिनी असलेली भवानीमाता शतकानुशतके या प्रदेशाच्या श्रद्धेचे केंद्र राहिली आहे. मात्र या शक्तिपीठाभोवती आणखी एक प्राचीन धार्मिक परंपरा आजही जिवंत आहे. ती म्हणजे भैरव उपासना. तुळजापूर, सोनारी, माणकेश्वर, धारूर, पानगाव, सुर्डी, जुनोनी, तेर आणि बार्शी तालुक्यातील धामणगाव अशा अनेक गावांत विखुरलेली भैरवाची मंदिरे, मूर्ती, शिल्पे आणि लोकपरंपरा या प्रदेशाच्या सांस्कृतिक इतिहासातील एक वेगळेच पान उलगडतात. शैव आणि शाक्त परंपरेत भैरव हा केवळ उग्र देव नसून क्षेत्रपाल मानला जातो. गावाची, देवस्थानाची आणि सीमारेषेची रक्षा करणारा देव म्हणून त्याची प्रतिष्ठा आहे. म्हणूनच अनेक प्राचीन मंदिरांच्या बाह्यभागात, प्राकाराजवळ किंवा गावाच्या वेशीवर भैरवाची स्थापना केलेली दिसते. तुळजाभवानीच्या क्षेत्रात तर अष्टभैरवांची परंपरा आजही जिवंत आहे.

या संपूर्ण भैरव संस्कृतीपटात बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे आढळलेले एक शिल्प विशेष लक्ष वेधून घेते. प्रथमदर्शनी ते साधे वाटले तरी त्याचा अभ्यास करताना त्यामागे दडलेली सांस्कृतिक परंपरा उलगडू लागते. हे शिल्प स्थानिक लोक ‘भैरवपाद’ म्हणून ओळखतात. करड्या-काळपट दगडात घडविलेल्या या पादपीठाच्या मध्यभागी पादुका कोरलेली आहे, परंतु त्याचे वैशिष्ट्य पादुकेमध्ये नसून तिच्याभोवती कोरलेल्या प्रतिमांमध्ये आहे. चौकोनी पादपीठाच्या चारही बाजूंवर चार मुंडकी कोरलेली आहेत. त्यापैकी तीन बाजूंना रेड्यांची मस्तके असून चौथ्या बाजूस मानवी नरमुंड कोरलेले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे शिल्प अत्यंत दुर्मिळ मानावे लागेल. दक्षिण भारतात भैरवपाद किंवा पादुका स्वरूपातील काही उदाहरणे आढळतात, परंतु रेड्यांच्या मस्तकांसह आणि नरमुंडासह सजविलेले असे पादपीठ अत्यंत विरळ आहे. शिल्पावरील झीज पाहता ते अनेक शतकांपासून उघड्यावर असल्याचे दिसते. त्यावर कोणताही शिलालेख नसल्याने त्याची अचूक तारीख सांगणे कठीण असले तरी शैली, दगड आणि रचना पाहता ते साधारणपणे बाराव्या ते चौदाव्या शतकातील असावे असे वाटते.

या शिल्पातील प्रतिमा अनेक प्रश्न निर्माण करतात. तीन रेडामस्तके आणि एक नरमुंड यांचा नेमका अर्थ काय? हा केवळ सजावटीचा भाग आहे की त्यामागे विशिष्ट धार्मिक संकल्पना दडलेली आहे? याचे निश्चित उत्तर उपलब्ध नसले तरी काही सांस्कृतिक संदर्भ या शिल्पाचा अर्थ समजून घेण्यास मदत करतात.

भारतीय लोकपरंपरेत रेडा हा शक्ती, कृषीसमृद्धी आणि पशुधनाचे प्रतीक मानला जातो. पशुपालक समाजात त्याला विशेष स्थान होते. दुसरीकडे भैरव हा श्मशान, कपाल, नरमुंड आणि उग्र साधनांशी संबंधित देव मानला जातो. भैरवाच्या अनेक प्रतिमांमध्ये नरमुंडमाला, कपालपात्र किंवा छिन्नमस्तकांचे संकेत दिसून येतात. त्यामुळे धामणगावच्या या शिल्पात पशुधनाचे प्रतीक असलेल्या रेड्यांच्या मस्तकांबरोबर नरमुंडाची उपस्थिती ही ग्रामीण जीवन आणि उग्र शैव परंपरा यांचा संगम दर्शवत असावी अशी शक्यता व्यक्त करता येते.

भैरव परंपरेचा अभ्यास करताना तुळजापूर परिसरातील इतर स्थळेही महत्त्वाची ठरतात. पानगाव येथे सुमारे सात फूट उंचीची चालुक्यकालीन भैरव प्रतिमा आहे. तिच्या चेहऱयावरील उग्रता आणि शरीरावरील अलंकार प्राचीन शिल्पकारांच्या कौशल्याची साक्ष देतात. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार काही वर्षांपूर्वी ही मूर्ती जमिनीत गाडण्यात आली होती. दुष्काळानंतर ती पुन्हा बाहेर काढून मंदिरात स्थापित करण्यात आली. लोकश्रद्धा आणि प्राचीन वारसा यांचा असा संगम क्वचितच पाहायला मिळतो.

सोनारी येथे हातात नरमुंड धारण केलेला भैरव आढळतो. माणकेश्वरच्या प्राचीन मंदिरावर भैरव प्रतिमा कोरलेल्या दिसतात. सुर्डी येथे आत्मबलिदानाशी संबंधित शिल्पे आढळतात. धारूर, जुनोनी आणि तेर या ठिकाणीही भैरव परंपरेचे विविध पुरावे दिसून येतात. ही सर्व स्थळे नकाशावर मांडली तर तुळजापूर केंद्राभोवती भैरव उपासनेचा एक घनदाट पट्टा तयार झालेला दिसतो.

या प्रदेशाचा सांस्कृतिक इतिहास पाहिला तर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी आणि विजयनगर अशा विविध राजसत्तांचा प्रभाव येथे पडलेला दिसतो. प्रत्येक काळात शैव आणि शाक्त परंपरेने वेगवेगळे रूप धारण केले. काही ठिकाणी उग्र तांत्रिक छटा दिसतात, तर काही ठिकाणी ग्रामदेवता आणि क्षेत्रपाल या स्वरूपात भैरव लोकजीवनाचा भाग बनतो. म्हणूनच भैरवाच्या प्रतिमा केवळ धार्मिक मूर्ती नसून त्या स्थानिक समाजाच्या मानसिकतेचे, भीतीचे, संरक्षणाच्या कल्पनेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत.
धाराशीव जिह्यातील हिंग्लजवाडी हे आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे असलेले प्राचीन पंचायतन मंदिर स्थापत्यदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्यभागी शिवपिंड आणि तिच्याभोवती इतर देवतांची रचना दिसते. स्थानिक लोकपरंपरा, पारधी समाजाच्या काही धार्मिक प्रथा आणि गावाभोवतीच्या देवस्थानांचा अभ्यास केला असता शैव, शाक्त आणि भैरव परंपरांचा परस्पर संबंध स्पष्ट होतो. अनेकदा लिखित इतिहास जिथे मौन बाळगतो तिथे लोकपरंपरा भूतकाळाचे धागे जपून ठेवतात.

भैरव हा या प्रदेशातील अनेक घराण्यांचा कुलदैवत म्हणूनही पूजला जातो. माळी, धनगर, कुंभार, मराठा, दलित आणि इतर अनेक समाजघटकांमध्ये भैरवाविषयी विशेष श्रद्धा आहे. उग्र रूप असूनही तो संरक्षण करणारा देव आहे, अशी लोकांची धारणा आहे. म्हणूनच भैरवाविषयी भीती आणि भक्ती हे दोन्ही भाव एकाच वेळी दिसून येतात.
धामणगावचा भैरवपाद या सर्व परंपरांच्या पार्श्वभूमीवर पाहिला तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. हे शिल्प केवळ एका गावातील प्राचीन अवशेष नाही. ते या संपूर्ण प्रदेशातील धार्मिक कल्पना, लोकविश्वास, ग्रामरक्षणाची संकल्पना आणि भैरवाच्या क्षेत्रपाल रूपाचे प्रतीक म्हणून उभे आहे. तुळजापूर परिसरातील भैरव परंपरा ही केवळ धार्मिक इतिहासाची गोष्ट नाही. ती लोकसंस्कृती, स्थापत्य, मूर्तिशास्त्र, लोकविश्वास आणि सामाजिक स्मृती यांचा एकत्रित वारसा आहे.

धामणगावचा दुर्मिळ भैरवपाद हा त्या वारशाचा एक महत्त्वाचा दुवा आहे. शांतपणे एका कोपऱयात पडून असलेले हे शिल्प आजही शतकानुशतके जुनी कथा सांगत आहे.

Comments are closed.