पाऊलखुणा – मुंबईचा ‘जन्म दाखला’, 1665 चा करार आणि एका शहराची सुरुवात

>> यशोधन जोशी, [email protected]

पोर्तुगीजांनी मुंबई ब्रिटिशांना हस्तांतरीत केली खरी परंतु आजवर याबाबतचे कागदोपत्री पुरावे समोर आले नव्हते. मुंबईचा हा ‘जन्म दाखला’ नुकताच एका संशोधनादरम्यान समोर आला. 18 फेब्रुवारी 1665 चा ‘इन्स्ट्रुमेंट ऑफ डिलिव्हरी’ या दस्तऐवजाचे हस्तांतरण आताच्या या आधुनिक महानगराच्या उभारणीची पहिली पायरी ठरले.

मुंबई…आज आपण ज्या मुंबईत राहतो, तिचा अधिकृत ‘जन्म दाखला’ मानला जातो तो 18 फेब्रुवारी 1665 चा ‘इन्स्ट्रुमेंट ऑफ डिलिव्हरी’. दहा पानांच्या या दस्तऐवजाने मुंबईची सात विखुरलेली बेटं पहिल्यांदा एका प्रशासकीय छत्राखाली आणली. हा केवळ जमिनीच्या हस्तांतरणाचा कागद नव्हता, तर आधुनिक महानगराच्या उभारणीची ती पहिली पायरी होती.

राजघराण्यांचं लग्न आणि मुंबईचा हुंडा

या सगळ्याची सुरुवात झाली युरोपात. 1661 मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रागांझा यांचा विवाह ठरला. लग्नाच्या अटींमध्ये एक महत्त्वाची तरतूद होती. मुंबईचं बंदर आणि सात बेटं इंग्रजांना हुंडा म्हणून द्यायची.

अंजदीव बेटावरील प्रतीक्षा आणि संघर्ष

1662 मध्ये राजा चार्ल्सने सर अब्राहम शिपमन यांना पाच जहाजे आणि 500 सैनिकांसह मुंबईचा ताबा घेण्यासाठी पाठवलं, पण गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉय अँटोनियो डी मेलो डी कॅस्ट्रो यांनी ताबा देण्यास नकार दिला. त्यांनी कायदेशीर त्रुटी दाखवल्या. करारात फक्त ‘बंदर’ दिल्याचं लिहिलं होतं, ‘बेटं’ नाहीत, असा त्यांचा दावा होता.

परिणामत ब्रिटिश ताफ्याला कारवारजवळच्या अंजदीव या लहानशा बेटावर थांबावं लागलं. ते बेट मलेरियाग्रस्त होतं. पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची कमतरता होती. पुढील दोन वर्षांत 300 ब्रिटिश सैनिक आणि स्वत शिपमन यांचा आजाराने मृत्यू झाला. 5 एप्रिल 1664 रोजी मृत्युशय्येवर असताना शिपमन यांनी आपला सचिव हंफ्रे कुक याला आपला वारसदार नेमलं. कुक उच्चकुलीन नव्हता, पण तो एक व्यवहारचतुर अधिकारी होता. त्याने उरलेल्या सैनिकांना एकत्र ठेवलं आणि ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.

18 फेब्रुवारी 1665 – मलबार हिलवरचा तो दिवस

अखेर दोन वर्षांच्या वाटाघाटींनंतर पोर्तुगीज ताबा देण्यास तयार झाले. 18 फेब्रुवारी 1665 रोजी हंफ्रे कुक अंजदीवहून मुंबईच्या बंदरात दाखल झाला. हस्तांतरणाचा अधिकृत सोहळा मलबार हिलवर पार पडला. मलबार हिलवर तेव्हा डोना इग्नेझ डी मिरांडा नावाच्या पोर्तुगीज महिलेची मोठी हवेली होती. डोना इग्नेझ या मुंबईच्या सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली रहिवाशांपैकी एक होत्या. त्यांच्याच घराच्या दालनात ब्रिटिश आणि पोर्तुगीज अधिकारी एकत्र आले.

तारखेचा विलक्षण गोंधळ

या ऐतिहासिक घटनेच्या नोंदीमध्ये तारखेचा एक रंजक फरक आढळतो. पोर्तुगीज कागदपत्रांनुसार ही तारीख 18 फेब्रुवारी 1665 आहे, तर ब्रिटिश नोंदीनुसार ती 8 फेब्रुवारी 1665 अशी दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे पोर्तुगीज ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ वापरत होते, तर ब्रिटिश अजूनही जुन्या ‘ज्युलियन कॅलेंडर’चे पालन करत होते. हा दहा दिवसांचा फरक दोन भिन्न साम्राज्यांच्या कालगणनेची साक्ष देतो.

करारातील महत्त्वाचे मुद्दे

करारात अनेक गोष्टी नमूद होत्या. माझगाव, परळ, वरळी, माहीम ही गावं आता ब्रिटिश सत्तेखाली आली. कराराने स्पष्ट आश्वासन दिलं की, स्थानिक लोकांच्या धर्मात आणि प्रथांमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. खासगी मालमत्तेला धक्का लावला जाणार नाही.

याच कराराच्या सातव्या पानावर `Sivagy` असा उल्लेख आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दस्तऐवजात लिहिलेलं आहे की, ‘राजे शिवाजींच्या वाढत्या धोक्यापासून वाचण्यासाठी हे हस्तांतरण लवकर होणे आवश्यक आहे.’ 1660 नंतर मराठ्यांची शक्ती झपाट्याने वाढत होती. त्यामुळे पोर्तुगीजांना मुंबई इंग्रजांच्या लवकरात लवकर हवाली करायची होती. कारण अचानक छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई आपल्या ताब्यात घेतली तर ती सोडवणे पोर्तुगीज आणि इंग्रज या दोघांच्याही ताकतीबाहेरचं होतं.

ताबा घेण्याची पद्धत

हंफ्रे कुकने मुंबईचा ताबा घेताना त्या काळातील ‘कॉर्पोरल पझेशन’ ही पद्धत वापरली. मुंबईच्या जमिनीवर प्रत्यक्ष चालून आणि मुंबईची माती आणि दगड हातात घेऊन मुंबईवर आपल्या राजाचा हक्क प्रस्थापित केला. त्याशिवाय आजच्या आयएनएस आंग्रे या भागातील किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजांवरून फिरून ती लष्करी ठिकाणं आपला राजा चार्ल्सच्या ताब्यात आल्याचं लाक्षणिक अर्थाने दाखवून दिलं. 10 मार्च 1665 रोजी पोर्तुगीज राजमुद्रेने हा दस्तऐवज अधिकृतरीत्या सीलबंद करण्यात आला. हा करार फक्त सात बेटांचा व्यवहार नव्हता. त्यातून मुंबईला एक ओळख मिळाली. पुढे ईस्ट इंडिया कंपनीने 1668 मध्ये ही बेटं राजाकडून भाड्याने घेतली आणि मग हळूहळू व्यापार, बंदर व स्थलांतरितांमुळे मुंबई वाढत गेली. 18 फेब्रुवारी 1665 हा दिवस म्हणजे खऱया अर्थाने आधुनिक मुंबईचा जन्मदिवस होता.
(लेखक सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

Comments are closed.