समाजभान – ‘ग्रूमिंग’च्या जाळ्यात अल्पवयीन
>> अंजली महाजन
डिजिटल युगात स्मार्टफोन आणि समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसमोर 'बाल संगोपन‘चे एक नवे आणि अदृश्य संकट उभे ठाकले आहे. केवळ मैत्रीच्या आणि आपुलकीच्या नावाखाली गुन्हेगार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मुलांचा विश्वास जिंकून त्यांना भावनिक आणि मानसिक जाळ्यात कसे अडकवतात, याचे धक्कादायक वास्तव ताज्या आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे.
डिजिटल युगात मुलांच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आल्यापासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. यातील सर्वात गंभीर आणि अदृश्य धोका म्हणजे ‘चाईल्ड ग्रूमिंग’ होय. नुकत्याच समोर आलेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून आणि मनोरंजन विश्वातील काही गाजलेल्या प्रकरणांतून गुन्हेगार अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात कसे ओढतात, याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ग्रूमिंग ही अचानक घडणारी घटना नसून ती अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विणलेली एक मानसिक आणि भावनिक प्रक्रिया असते. यामध्ये संबंधित व्यक्ती प्रथम लहान मुलांचा किंवा किशोरवयीन मुलींचा विश्वास संपादन करते, त्यांना भावनिकदृष्टय़ा आपल्या प्रभावाखाली आणते आणि हळूहळू त्यांच्या कुटुंबीयांपासून व मित्रांपासून दूर नेऊन लैंगिक शोषणासाठी तयार करते. या संपूर्ण प्रक्रियेत पीडित मुलाला आपल्यासोबत नेमके काय घडत आहे, याची साधी कल्पनाही येत नाही, हाच या संकटाचा सर्वात मोठा धोका आहे.
सर्वसाधारणपणे असा समज असतो की, ग्रूमिंगची एक ठरावीक पायरी असते; ज्यामध्ये आधी मैत्री केली जाते, मग विश्वास जिंकला जातो, त्यानंतर संवाद गुपित ठेवण्यास सांगितले जाते आणि शेवटी शोषणाचा प्रयत्न होतो. मात्र, संशोधकांच्या मते प्रत्यक्ष वास्तव इतके सरळ नसते. जर ही प्रक्रिया एका ठरावीक क्रमाने घडत असती, तर मुले किंवा पालक तिचे टप्पे ओळखून वेळीच सावध होऊ शकले असते. प्रत्यक्षात गुन्हेगार समोरच्या मुलाची मानसिकता, त्याची कौटुंबिक परिस्थिती आणि आपला उद्देश पाहून आपली रणनीती सतत बदलत असतात. एका संशोधकाने 12 ते 14 वर्षांच्या मुलींचे रूप धारण केलेल्या स्वयंसेवकांसोबत गुन्हेगारांनी केलेल्या प्रत्यक्ष ऑनलाइन संवादाचे सखोल विश्लेषण केले. या अभ्यासातून असे समोर आले की, गुन्हेगार मुलांना जाळ्यात अडकवण्यासाठी चौदा विविध क्लृप्त्यांचा वापर करतात आणि त्यांचा कोणताही निश्चित क्रम नसतो. यामध्ये मैत्री वाढवण्यापासून ते स्वतच्या खासगी गोष्टी सांगून जवळीक निर्माण करणे, मुलांच्या पालकांच्या घरी असण्याच्या वेळा जाणून घेणे, त्यांच्या आयुष्यात कोणी मित्र आहे का याची चाचपणी करणे आणि हळूहळू लैंगिक विषयांवर चर्चा सुरू करणे अशा अनेक डावपेचांचा समावेश असतो.
या संपूर्ण जाळ्यातील सर्वात महत्त्वाचे शस्त्र म्हणजे विश्वास संपादन करणे. गुन्हेगार संवादाच्या माध्यमातून मुलांची खोटी स्तुती करतात, त्यांच्या भावना समजून घेत असल्याचा आव आणतात आणि आपण त्यांच्यावर खूप विश्वास ठेवतो असे भासवतात. त्यामुळे समोरची व्यक्ती आपली अत्यंत जवळची आहे आणि तिलाच आपली खरी काळजी आहे, अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होते. एकदा हा विश्वास दृढ झाला की, गुन्हेगार मुलांना त्यांच्या पालकांपासून आणि इतर मित्रांपासून दूर करू लागतात. यासोबतच गुन्हेगार ‘जोखीम आणि फायदा’ यांचे अचूक गणित मांडत असतात. कोणते मूल आपल्या जाळ्यात सहज अडकू शकते आणि कोणाकडून तक्रार होण्याची शक्यता कमी आहे, याचा ते सतत अंदाज घेतात. एका अभ्यासात असे दिसून आले की, एका गुन्हेगाराने तब्बल एक हजार मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटवर अनेक बनावट ओळखी तयार केल्या होत्या. बहुतांश मुलांनी त्याला प्रतिसाद दिला नाही तरीही काही संवेदनशील आणि एकलकोंडी मुले त्याच्या जाळ्यात अडकतील, या विचाराने तो सतत नवनवीन शिकार शोधत राहिला.
संवादादरम्यान मुलांवर मानसिक दबाव टाकण्यासाठी गुन्हेगार अत्यंत चलाखीने भाषेचा वापर करतात. आपण कोणतीही जबरदस्ती करत नसून समोरच्या मुलाचीच याला संमती आहे, असे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उदाहरणादाखल, “तुला किती पुढे जायचे आहे किंवा तुला काय करायचे आहे ते तूच सांग.’’ असे प्रश्न विचारून ते संवादाची जबाबदारी पीडित मुलावरच ढकलतात. त्यामुळे मुलांना स्पष्टपणे नकार देणे कठीण होऊन बसते आणि भविष्यात स्वतचा बचाव करण्यासाठी गुन्हेगाराला पळवाट मिळते. याशिवाय, आक्षेपार्ह किंवा लैंगिक मागणी केल्यानंतर वाक्याच्या शेवटी हसण्याचे किंवा विनोद केल्याचे सांकेतिक शब्द वापरण्याची एक नवी पद्धतही संशोधनात समोर आली आहे.
भारतात वाढत्या डिजिटल वापरामुळे ‘सेक्स्टॉर्शन’ आणि ऑनलाइन जाळ्यात ओढण्याचे प्रकार वेगाने वाढत असले तरी कायदेशीर पळवाटा आणि तपासातील तांत्रिक अडचणींमुळे शिक्षा होण्याचे प्रमाण अद्याप मर्यादित आहे. सामाजिक बदनामीच्या भीतीने किंवा माहितीअभावी बहुतांश प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाहीत. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सायबर टिपलाइन अहवालानुसार, 2025 या वर्षात भारताशी संबंधित बालकांच्या ऑनलाइन लैंगिक शोषणाचे तब्बल 19 लाख (1.9 दशलक्ष) अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये संशयास्पद संवाद, ऑनलाइन ग्रूमिंगचे प्रयत्न आणि आक्षेपार्ह मजकुराची देवाणघेवाण यांचा समावेश आहे.
सध्या भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींच्या आधारे या गुह्यांचा तपास केला जातो. मात्र गुन्हेगाराने मुलांचा विश्वास जिंकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच कारवाई करण्यासाठी ‘ऑनलाइन ग्रूमिंग’ला स्वतंत्र दखलपात्र गुन्हा ठरवण्याची मागणी बालहक्क कार्यकर्ते आणि कायदेतज्ञांकडून सातत्याने केली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या माध्यमातून या वाढत्या धोक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी पालक आणि शाळांमधील डिजिटल साक्षरता हाच या संकटावरील सर्वात प्रभावी उपाय मानला जात आहे.
(घ्याखिका समाजशास्त्र अभ्यासक आहेत)
Comments are closed.