वाचककट्टा- शिवांजली साहित्य चळवळ-जुन्नर

>> तृप्ती कुलकर्णी

[email protected]

वाचन संस्कृती जपणाऱया विविध साहित्यिक समूहांचा शोध घेणारे ‘वाचककट्टा’ हे सदर. या सदरातून प्रत्येक समूहाची वाटचाल, त्यातील उपक्रम आणि समूहाचे साहित्य विश्वातील योगदान यांचा परिचय करून दिला जाईल.

दृष्टी सगळ्यांकडे असते, पण द्रष्टेपणा तो मात्र काही अपवादात्मक लोकांकडेच असतो आणि अशाच एका द्रष्टय़ाने घडवलेली ‘शिवांजली साहित्य चळवळीची’ ही गोष्ट.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी गावातलं चाळकवाडी गाव, इथेच 27 फेब्रुवारी 1959 रोजी शिवाजी सखाराम चाळक यांचा जन्म झाला. वारकरी परंपरेचे संस्कार, भजन-कीर्तन आणि साधेपणाच्या वातावरणात त्यांच्या मनात संवेदनशीलता आणि विचारांची श्रीमंती नकळत रुजत गेली.

लहानपणी बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने वीररसपूर्ण पोवाडय़ाच्या लेखनातून त्यांच्या लेखनप्रवासाची सुरुवात झाली. पुढे शिक्षण, नोकरी आणि संसार सांभाळतानाही महाराष्ट्र शासनात अभियंता असूनही त्यांची लेखणी कधी थांबली नाही; उलट इतरांनाही वाचायला, विचार करायला आणि लिहायला प्रेरित केलं.

1993 साली गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी ‘शिवांजली विद्यानिकेतन’ची स्थापना केली. येथे शिक्षणासोबत संस्कार आणि संस्कृतीची जोड देत 1994 पासून कवी संमेलन, कथाकथन, चर्चासत्रे असे उपक्रम सुरू झाले, ज्यात विद्यार्थी, शिक्षक हितचिंतक, सहकारी आणि विविध साहित्यप्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हा छोटासा उपक्रम हळूहळू सर्वांना जोडत गेला आणि पुढे शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, काव्य मंच, साहित्य मंच, साहित्यपीठ अशा व्यापक साहित्यिक चळवळींचा उगम झाला.

दरवर्षी 27 फेब्रुवारी, मराठी भाषा दिनी चाळकवाडीत साहित्य संमेलन भरू लागलं आणि त्याचं खास आकर्षण ठरली ‘साहित्य दिंडी.’ पुस्तकं, कविता आणि भाषेच्या प्रेमाचा उत्सव! मात्र, एका टप्प्यावर या दिंडीने अनवट वळण घेतलं. जुन्नर तालुक्यातील बौद्धकालीन लेण्या आणि नाणेघाट येथील शिलालेखांच्या अभ्यासातून ब्राह्मी लिपीत ‘मरहाटी’ हा शब्द आढळला. विशेष म्हणजे पुढे मराठी राजभाषा चळवळीमध्येही याच शब्दाचा महत्त्वपूर्ण आधार घेतला गेला. या जाणिवेतून साहित्य दिंडीचं रूपांतर ‘भाषादिंडी’मध्ये झालं. आणि 2002 पासून चाळकवाडी ते नाणेघाट अशी दिंडी काढण्याची परंपरा सुरू झाली. एका शिलालेखातील शब्दातून एवढं मोठं सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणणं, हे शिवाजी यांच्या द्रष्टेपणाचं उत्तम उदाहरण ठरलं. आज या प्रेरणादायी उपक्रमाचा बावीस वर्षांचा समृद्ध प्रवास पूर्ण झाला आहे. एखाद्या प्राचीन शिलालेखातील शब्दामुळे एका सांस्कृतिक उपक्रमाचे इतके मोठे रूपांतर घडणे ही घटना खरोखरच अपवादात्मक म्हणावी लागेल.

ही भाषा दिंडी चाळकवाडी येथून प्रारंभ होऊन नाणेघाट येथे पोहोचते. तेथे प्राचीन शिलालेखांना पुष्प अर्पण करून विधिवत पूजन केले जाते. त्यानंतर दरवर्षी एखाद्या तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्या शिलालेखांचे वाचन आणि अर्थविश्लेषण घडते. या अभ्यासपूर्ण वातावरणात पुढे मराठी भाषेवरील कवितांचे सादरीकरण होते आणि संपूर्ण परिसर भाषाभिमानाने भारून जातो. दिंडी पुन्हा चाळकवाडीत परतल्यानंतर शिवांजली साहित्य महोत्सवात महाराष्ट्रातील विविध नवोदित साहित्यिकांचा सन्मान केला जातो. येथे गौरविण्यात आलेले कवी, कथाकार आणि कादंबरीकार यांच्या  साहित्याने पुढे शालेय तसेच विद्यापीठीय अभ्यासक्रमात स्थान मिळविले आहे; त्यांच्या साहित्यकृतींना विविध संस्थांचे पुरस्कारही लाभलेत.

या सन्मानासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभते. पुरस्कार प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक असून, त्रिस्तरीय निवडीतून उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव केला जातो. हा सन्मान मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा स्वरूपात प्रदान केला जातो. महोत्सवाच्या समारोपानंतर सहभागींसाठी जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळांची सफर आयोजित करून ‘साहित्य पर्यटन’ही केले जाते. या काळात साहित्यिकांचा निवास ग्रामस्थांच्या घरीच ‘आपले साहित्यिक, आपले पाहुणे’ या भावनेतून असल्याने संपूर्ण सोहळ्याला कौटुंबिक जिव्हाळा लाभतो.

अत्यल्प खर्चात आणि बिगर मानधनावर उभी असलेली ही चळवळ 2017 पर्यंत सीताबाई व सखाराम चाळक यांचे कुटुंबीय यांच्या पाठबळावर चालली; त्यानंतर सेवकवर्ग, हितचिंतक आणि साहित्यप्रेमींनी ती सामूहिकपणे पुढे नेली. या कार्याची दखल घेत येथे महाराष्ट्र साहित्य परिषदची शाखा सुरू झाली आहे. ‘ज्येष्ठांचा सन्मान व नवोदितांना प्रोत्साहन’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारी ही भाषा व साहित्य चळवळ आहे. शालेय पातळीवर सुरू झालेला छोटासा उपक्रम आज व्यापक साहित्य चळवळ बनला असून द्रष्टय़ा विचाराची दूरगामी ताकद यातून स्पष्ट होते.

Comments are closed.