परीक्षण – उत्कंठावर्धक सैनिक कथा
>> निखिल कोठावदे
अलीकडेच प्रकाशित ‘अरुणोदय’ ही भावेश ब्राह्मणकर लिखित कादंबरी वाचण्याचे औचित्य प्राप्त झाले. पर्यावरणवादी मुक्त पत्रकार, सामरिक शास्त्राचे अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक म्हणून भावेश ब्राह्मणकर परिचित आहेत, पण त्यांची कादंबरीकार म्हणून नव्याने ओळख ‘अरुणोदय’च्या निमित्ताने आपल्या सर्वांना झाली. लेखकाने आपल्या साहित्यिक अनुभवाचा, पत्रकारितेचा आणि प्रवाही लेखनाचा उत्तम नमुना ‘अरुणोदय’च्या माध्यमातून साहित्य रसिकांना दिला आहे.
‘कुर्यात सदा मंगलम…’ या मंगल वाक्याने सुरू होणारी ‘अरुणोदय’ ‘जय हिंद’ या देशप्रेमाच्या सर्वोच्च घोषणेने समाप्त होते. अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली ही एक कथा आहे. ‘अरुण विश्वास देशकर’ या जवानाची कथा ‘अरुणोदय’ या कादंबरीतून लेखकाने मांडलेली आहे. एक तरुण देशभक्त लग्नाच्या बोहल्यावर चढताक्षणीच अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुट्टय़ा रद्द करून हजर राहण्याचे आदेश त्याला मिळतात. अरुण आदेशानुसार आपल्या तैनातीच्या ठिकाणी हजर होतो. पुढे त्याच्या वाटेला आलेला संघर्ष आणि त्याच्या सेनेतील अनुभवाच्या जोरावर येणाऱया संकटांना तोंड देत शेवटी एक बहादूर, चाणाक्ष आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अरुणची ओळख कादंबरीच्या प्रत्येक पान उलगडताना होते. एका जवानाचे कुटुंब एकाच वेळी भावनिक, आर्थिक, आणि कौटुंबिक संघर्षातून कसे जात असते याचाही परिचय लेखकाने करून दिला आहे. अरुण देशकरची कौटुंबिक पार्श्वभूमी ही खान्देशमधील आहे. तेथील शेती आणि पाण्याचा प्रश्न, निसर्गावर आणि बाजारावर अवलंबून असणाऱया शेतकऱयाची लघु आत्मकथासुद्धा अरुणचे वडील विश्वास देशकर या पात्रातून आपणास वाचावयास मिळते.
विश्वास देशकर हे पात्र रंगवताना खान्देशी अहिराणी बोलीचा वापर, अरुण आणि त्याच्या आसपासची पात्रे कर्नल शर्मा, ब्रिगेडियर सिन्हा आदी रंगवताना सैनिकी लहेजा, मेघा ही नवविवाहित वधू आपल्या लेखणीतून मांडताना तिच्यातील नाजूकपणा तसेच धीरगंभीर स्वभाव अगदी सहजतेने जाणवतो. याबाबी लेखकाच्या साहित्यिक परिपक्वतेचे दर्शन घडवतात. केवळ अरुण विश्वास देशकर हेच पात्र लेखकाने मोठे केलेले नाही, तर त्याच्या आसपास असलेल्या सर्व पात्रांची अगदी सहजतेने ओळख लेखकाने करून दिली आहे. त्यांना फुलवले आहे. मात्र कर्नल विष्णू देव शर्मा, ब्रिगेडियर सिन्हा ही लष्करातील पात्र आप्पा, मेघा इत्यादींच्या तुलनेत लेखकाला अजून उलगडून दाखवता आली असती असेसुद्धा म्हणता येईल.
अरुणाचल प्रदेशातील तवांग भागातील लुम्पो या ठिकाणी अरुण तैनात असतो. लेखकाने स्वत कादंबरीचे लिखाण करताना अरुणाचल प्रदेश येथे प्रवास केला. तिथला भूभाग, सैनिकी माहिती इत्यादींचा चांगलाच अभ्यास केला आहे. म्हणून ‘अरुणोदय’ केवळ एक कल्पनाविलास वाटत नाही, तर एकाच वेळी ते एक प्रवास वर्णन, भारत-चीन सीमावादावर एक स्फुट लेखन, एक रोमांच पूर्ण प्रसंगांनी भरलेली देशप्रेमाची कथा, खान्देशी गावगाडय़ाचे दर्शन घडवणारे लेखन, अरुण आणि मेघा या नवविवाहित जोडप्याची उत्कट प्रेमकथा असे सगळे एकाच वेळी वाचायला मिळते. लेखकाने कादंबरीत त्यांच्या कादंबरीच्या लिखाण निमित्ताने केलेल्या प्रवासातील फोटोचा अतिशय सुयोग्य वापर केला आहे.
अरुण विश्वास देशकर हा अगदी आपल्या आसपास परिचयात असलेल्या जवानप्रमाणेच भावतो. तवांग, भारत-चीन सीमा, अरुणाचल प्रदेश आणि तिथल्या सर्वच प्रदेशांची अभ्यासपूर्ण माहिती या कादंबरीत लेखकाने गुंफली आहे. एकीकडे भारत-चीन सीमावाद, लष्करी जीवन आणि त्यातील आव्हाने, तर दुसरीकडे देशासाठी कर्तव्यावर असलेल्या जवानाची आणि त्याच्या कुटुंबाची होणारी ओढाताण, अनिश्चिततेची पण तरीही व्यवस्थेवरचा विश्वास न ढळू देणारी मनाची घालमेल, प्रेम काळजी आणि माया ही आप्पा, श्यामलाल, आक्का, मेघा, प्रियंका यांच्या रूपाने लेखकाने अतिशय रोमहर्षकरीत्या उलगडून दाखवली आहेत.
कादंबरीचे प्रवाही असणे आणि प्रत्येक पान वाचताना पुढे काय होणार? याची वाटणारी उत्कंठा ही कादंबरीची बलस्थाने असतात. ‘अरुणोदय’ वाचताना या दोन्ही बाबी प्रकर्षाने जाणवतात. लेखक जागतिक आणि राष्ट्रीय राजकारण, पर्यावरण, माध्यम, ब्लॉगिंग, मराठी साहित्य लेखन, सामरिक शास्त्र या सर्व विषयात एक सरकारी अधिकारी व्यक्ती म्हणून लेखकाचे व्यक्तिमत्त्व नेहमीच भावते. लेखकाच्या या व्यावसायिक आणि खासगी जीवनातील प्राधान्य म्हणून तुम्ही अंगीकारलेल्या गुणविशेषांचे लिखित उत्कट रूप म्हणजे ‘अरुणोदय’ ही कादंबरी होय.
कादंबरी – अरुणोदय
लेखक : भावेश ब्राह्मणकर
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे ः 276 n किंमत ः 400 रूपये
Comments are closed.