बारावीच्या निकालाचे ‘बारा’ वाजले! 2.97 टक्क्यांची मोठी घसरण, कोकण पुन्हा सरस

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी घसरल्याने निकालाचे ‘बारा’ वाजले आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत 2.97 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 94.14 इतका लागला असून सर्वात कमी 84.14 इतका लातूर विभागाचा लागला आहे. त्यामुळे या वर्षीदेखील ‘लातूर पॅटर्न’ अपयशी ठरला आहे. निकालात दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून हा निकाल 93.15 आहे, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 86.80 टक्के आहे.

बारावी परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14 लाख 44 हजार 713 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीच्या परीक्षेला या वर्षी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14 लाख 33 हजार 58 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.79 आहे. तसेच खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 37 हजार 559 एवढी होती. त्यापैकी 36 हजार 941 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी 29 हजार 634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 80.21 आहे.

मुंबईचा निकाल 90.08 टक्के, गतवर्षीपेक्षा 2.85 टक्के घट

मुंबई विभागाचा सर्व शाखांचा एकत्रित निकाल 90.08 टक्के लागला आहे. राज्याच्या निकालाप्रमाणेच मुंबई विभागाच्या निकालात घट झाली असून मुंबईचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 2.85 टक्क्यांनी घटला आहे, तर मुंबईच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये बारावीचा निकाल 92.93 टक्के लागला होता. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 87.99 टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.25 टक्के आहे.

शाखांनिहाय निकाल ः  विज्ञान शाखा – 96.44 टक्के , कला शाखा –  78.2 टक्के, वाणिज्य शाखा – 87.03 टक्के, व्यवसाय शाखा 82.74 टक्के, आयटीआय  – 81.78 टक्के विभागनिहाय टक्केवारी

कोकण              94.14

पुणे                  91.25

नागपूर              88.67

छत्रपती संभाजीनगर        88.68

मुंबई                 90.08

कोल्हापूर            89.97

अमरावती           90.92

नाशिक             90.72

लातूर                84.14

…म्हणून निकाल घटला

परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. भरारी पथके स्थापन करण्यात आली. 100 कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली तर 15 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले. गतवर्षी एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. या वर्षी घेतलेल्या खबरदारीमुळे गैरप्रकारांना आळा बसला अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यामुळेच निकाल घटल्याचे सांगितले जात आहे.

Comments are closed.