‘राजा शिवाजी’ सिनेमाला उदंड प्रतिसाद! हाऊसफुल्ल!! लाल किल्ल्यावर चित्रपट दाखवा – आदित्य ठाकरे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाला महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. सहकुटुंब हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी होत असून जागोजागी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. ‘जय भवानी… जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी थिएटर दणाणून जात आहे.
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपट महाराष्ट्रदिनी मराठीसह हिंदीत प्रदर्शित झाला. यात रितेश देशमुख याने शिवरायांची भूमिका साकारली असून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील त्यानेच सांभाळली आहे. रितेशसह जेनेलिया देशमुख, सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, जितेंद्र जोशी, फरदीन खान, विद्या बालन, भाग्यश्री अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात आहे. बाल शिवाजी ते राजा शिवाजीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास या भव्यदिव्य चित्रपटातून मांडण्यात आला आहे. शौर्य, नेतृत्व, स्वराज्याची प्रेरणा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणारा हा चित्रपट पाहताना प्रेक्षक भावुक होत आहेत. चित्रपटातील अनेक प्रसंग पाहताना अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत. अजय-अतुल या जोडीने संगीतबद्ध केलेले ‘माय भवानीचा तू वाघ रे…’ हे गाणं सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.
पहिल्याच दिवशी 12.40 कोटींची कमाई
पहिल्याच दिवशी तब्बल 12.40 कोटी रुपयांची बंपर ओपनिंग मिळवत ‘राजा शिवाजी’ हा सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. सर्वच शो हाऊसफुल्ल होत आहेत. चित्रपटाची व्रेझ पाहता वीकेण्डला हा चित्रपट मोठी कमाई करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.
महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशभरात चौकाचौकात ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट दाखवावा. शाळेच्या मुलांनाही दाखवावा अशी माझी विनंती आहे. माझी ही पण इच्छा आहे की, लाल किल्ल्यावर हा चित्रपट दाखवावा. दिल्लीला कळावं की, महाराष्ट्राची माती काय आहे हे लाल किल्ल्यावरून दिसू दे… – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते
Comments are closed.