महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पडला! 24 तासांत दोन चिमुरड्यांवर अत्याचार आणि हत्या, पुण्यात नसरापूर आणि चाकणमध्ये मन सुन्न करणाऱ्या घटना

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरशः मुडदा पडला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन भयंकर घटना पुणे जिह्यात घडल्या आहेत. पुण्यातील भोर आणि चाकण येथे दोन चिमुरडय़ांवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या 24 तासांत या घटना घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनांचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून व कडकडीत बंद पाळून या घटनांचा निषेध केला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

‘गायीचे वासरू दाखवतो’ असे सांगून भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षांच्या नराधमाने अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर गोठय़ात नेऊन अत्याचार केला आणि दगडाने ठेचून तिचा खून  केला. नराधम आरोपीने त्या चिमुरडीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध खून, बलात्कार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नसरापुरात कडकडीत बंद

ही घटना उघडकीस येताच संतापाची लाट उसळली. नसरापूर येथील ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर आंदोलन केले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी जमावाला शांत केले, मात्र शनिवारी पुन्हा आंदोलन सुरू झाले. नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळला. आरोपीला फाशी द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

फास्ट्र ट्रॅक कोर्टात खटला चालवणार – फडणवीस

‘संबंधित खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करेल. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या – सपकाळ

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या नावाला काळिमा फासणारा आहे, हे गृह विभागाचे अपयश असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व पूर्णवेळ गृहमंत्री राज्याला द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

संतप्त नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार देत चिमुरडीचा मृतदेह अॅम्ब्युलन्समधून नवले पूल परिसरात आणला आणि ठिय्या दिला. न्याय मिळत नाही, तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका घेतली.

मुली-बाळींचे रक्षण करू शकत नसाल तर लाडक्या बहिणींचे पैसे काय कामाचे?

नसरापुरातील घटनेमुळे संतापलेल्या स्थानिक महिलांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीचा बुरखाच टराटरा फाडला. ‘आमच्या मुलीबाळींचे संरक्षण करू शकत नसाल तर लाडक्या बहिणीचे पैसे काय कामाचे,’ असा सवाल या महिलांनी महायुती सरकारला केला. ’ या आरोपीला आमच्यासमोर फाशी झाली पाहिजे. तसं झालं तरच पुन्हा असं कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, अशी प्रतिक्रिया गावातील महिलांनी दिली.

चाकणमध्ये मुलावर अत्याचार

नसरापूरची घटना ताजी असतानाच चाकणमध्ये तीन वर्षांच्या मुलावर अत्याचार करून गळा चिरून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली. शुक्रवारी दुपारी मुलगा बेपत्ता झाला. पोलिसांना एका बंद खोलीत सुटकेसमध्ये त्याचा मृतदेह आढळला.

Comments are closed.