भोंदू खरातशी जवळीक भोवली, मनी लॉण्डरिंगप्रकरणी प्रतिभा चाकणकर यांना ईडीचे समन्स
भोंदूबाबा अशोक खरात याची जवळीक चाकणकर कुटुंबीयांना चांगलीच भोवली आहे. खरात मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याला समन्स पाठवले आहे. या दोघांनाही पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे.
समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 2022 ते 2024 दरम्यान ‘घोस्ट अकाऊंट्स’द्वारे 70.74 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. अशोक खरात याने 134 हून अधिक बनावट खाती उघडून निधी वळवल्याचा संशय आहे. भक्तांकडून केवायसी कागदपत्रे घेऊन त्यांच्या नकळत खाती उघडण्यात आली आहेत. या प्रकरणात ईडीच्या तपासाला आता वेग आला असून प्रतिभा आणि तन्मय चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
बनावट खात्यांचा दावा
प्रतिभा चाकणकर यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत संबंधित खाती पूर्णपणे बनावट आहेत. कोणतीही माहिती न देता बनावट स्वाक्षऱयांचा वापर करून ही खाती उघडण्यात आल्याचा दावा केला आहे.
पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणी खरातला पोलीस कोठडी
व्यवसायात भरभराट येण्यासाठी अवतार पूजेच्या नावाखाली एका व्यावसायिकाची पाच कोटींची फसवणूक केल्याच्या गुह्यात भोंदू अशोक खरात याला शुक्रवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. लॉजिस्टिकचा व्यवसाय जगभर पसरविण्यासाठी तसेच या व्यवसायात भरभराट होण्यासाठी अवतार पूजा करावी लागेल, त्यासाठी खर्च म्हणून पाच कोटी रुपये लुबाडल्याप्रकरणी अशोक खरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्याला व्हीसीद्वारे 1 मे रोजी न्यायालयात हजर केले होते, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
Comments are closed.