पोल्ट्री व्यवसायाला ‘बर्ड फ्लू’चा फटका, नवापूरमध्ये दीड लाख कोंबड्या, दहा लाख अंडी नष्ट
नंदुरबारच्या नवापूर येथील तीन पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ या खतरनाक रोगाची लागण झाली आहे. शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, दीड लाख कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक किलोमीटरच्या परिघातील हजारो टन कोंबडी खाद्य, दहा लाख अंडी आणि अन्य कच्चा माल नष्ट करण्यात येणार आहे. चिकनवर ताव मारणाऱ्या खवय्यांनीही धास्ती घेतली आहे. बर्ड फ्लूमुळे या व्यवसायावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे.
नंदुरबार जिह्यातील नवापूर हे राज्यातील पोल्ट्री व्यवसायाचे मोठे केंद्र आहे. सुमारे तीस पोल्ट्री फार्ममध्ये सद्यस्थितीत पंधरा लाख कोंबड्या आहेत. तेथील डायमंड, तस्लिमा आणि डॉन या तीन पोल्ट्रीमधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेचा याबाबत अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. वरील तीन पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिघात सर्वेक्षण करण्यात आले आहे. सात पोल्ट्रींमधील सुमारे दीड लाख कोंबड्या, दहा लाख अंडी, फीड मिलमधील हजारो टन खाद्य नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फक्त हा व्यवसाय करणारे उद्योजक आहेतच; परंतु पूरक व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. चिकनवर ताव मारणाऱया खवय्यांनी धास्ती घेतल्याने काही प्रमाणात चिकन व्यवसायात मंदी येण्याची शक्यता आहे. बाधित तीन पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिघातील एकूण सात पोल्ट्री फार्म तसेच घरोघरी असलेल्या पाळीव कोंबड्यांचेही सर्वेक्षण केले जात आहे.
नाशिक जिह्यात सतर्कतेचे आदेश
नाशिक जिह्यातही या व्यावसायिकांना जिल्हाधिकाऱयांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या रोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास, कोंबड्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढल्यास गांभीर्याने दखल घेऊन पावले उचलावीत. बाहेरील व्यक्तींचा पोल्ट्रीमधील प्रवेश मर्यादित ठेवावा, फार्मचे नियमित निर्जंतुकीकरण करावे, मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, नवीन पक्षी विलगीकरणात ठेवावे, स्वच्छता व जैवसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Comments are closed.