एआयच्या नावाखाली कर्मचारी कपातीला मनाई, चीनच्या न्यायालयाचा आदेश
‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर जसा वाढू लागला, तसा अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली. ‘एआय’मुळे जगभरात लाखो कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली, मात्र आता तसे चालणार नाही. ‘एआय’च्या नावाखाली कोणाला कामावरून काढता येणार नाही. चीनमधील ‘हांगझोऊ इंटरमिजियट पीपल्स कोर्ट’ने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे एआयचा वापर करून कर्मचाऱयांना कामावरून काढण्याच्या प्रकाराला चाप बसेल.
चीनमध्ये ‘एआय’शी संबंधित एका कंपनीने झोऊ नावाच्या कर्मचाऱ्याला कामावरून काढले होते. तो वर्ष 2022मध्ये या कंपनीत रुजू झाला होता. वापरकर्त्यांना एआय टूलद्वारे मिळणारा प्रतिसाद तसेच बेकायदा व चुकीचा मजकूर हटविण्याचे त्याचे काम होते. कंपनीने हळूहळू त्याच्या कामासाठी एआयचा वापर वाढवला आणि त्याला कमी पगारावर काम करण्यास सांगितले. त्याने त्यास नकार दिला. त्यामुळे कंपनीने त्याचा करार रद्द करून कामावरून काढले. हे करताना कंपनीने संस्थात्मक पुनर्रचना आणि कमी मनुष्यबळाची गरज असे कारण दिले. कंपनीने त्याला मोबदलादेखील दिला. मात्र, झोऊने हे अनुचित असल्याचे म्हणत लवादात आव्हान दिले. लवादाने त्याच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यास कंपनीने जिल्हा न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयानेदेखील कंपनीला खडे बोल सुनावत झोऊ याच्या बाजूने निर्णय दिला.
न्यायालयाने काय म्हटले?
झोऊच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, एखाद्या कर्मचाऱ्याच्या ऐवजी एआयचा वापर सुरू केल्यामुळे कामावरून काढण्यासाठी कायदेशीर आधार मिळत नाही. चीनमधील कामगार कायद्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यासाठी वैध कारण आवश्यक असते. एआयचा वापर केल्यामुळे मनुष्याचे काम हिरावून घेण्यासाठी परिस्थितीत मोठा बदल मानला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
Comments are closed.