वाचकट्टा – स्पीकर चेअर

>> तृप्ती कुलकर्णी, [email protected]

वाचन माणसाला विचारप्रवृत्त करते, तर कविता त्याच्या संवेदनांना समृद्ध करते. या दोन्हींचा सुंदर संगम घडवणारे ‘वाचकपीठ’ हे आजच्या काळातील एक आश्वासक सांस्कृतिक व्यासपीठ आहे.

‘दिसामाजी काहीतरी लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।’ समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘दासबोधा’तील या ओळी लेखन, वाचन आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या वैचारिक प्रगल्भतेचे महत्त्व अधोरेखित करतात. मात्र डिजिटल युगात रील्सच्या धडाक्यात वाचन संस्कृती आणि साहित्य संवादाला आजही स्थान आहे का, असा प्रश्न पुस्तकप्रेमीला पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर आहे ‘होय!’ गेल्या सहा वर्षांपासून वाचनाची आवड जोपासत, साहित्य संवाद घडवत आणि कवितेचा आस्वाद अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवत अहिल्यानगरचे ‘वाचकपीठ प्रतिष्ठान’ या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी एक आश्वासक चळवळ म्हणून कार्यरत आहे.

कोरोना काळात प्रत्यक्ष भेटण्यावर निर्बंध आले तेव्हा संवादाची भूक भागवण्यासाठी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत वाचकपीठाची स्थापना केली. गुगल मीटच्या माध्यमातून पुस्तकांवरील भाष्य, साहित्य चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. आज नोंदणीकृत संस्था म्हणून वाचकपीठ साहित्यविषयक चर्चांबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रमही राबवते.

वाचनाची आवड निर्माण करणे, वाचकांमध्ये संवाद घडवणे आणि काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या कवितेला सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. कथा आणि कविता हे साहित्यप्रकार आपल्या वैचारिक व भावनिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. जगताना कथा लागते, तर जगण्यातील वेदना समजून घेताना कवितेचीही गरज भासते. त्यामुळे कवितेचे जतन, संवर्धन आणि प्रसारण होणे आवश्यक आहे. ही जाणीव ठेवून वाचकपीठ सातत्याने कार्यरत आहे.

वाचकपीठातर्फे वर्षभरात प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांपैकी निवडक बारा संग्रह चर्चेसाठी घेतले जातात. सदस्य हे संग्रह विकत घेऊन वाचतात, त्यांचा अभ्यास करतात आणि परस्परांशी चर्चा करतात. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता संबंधित संग्रहावर दृक्-श्राव्य काव्यचर्चासत्र आयोजित केले जाते. यात प्रथम कवीचे मनोगत, त्यानंतर वाचकपीठाच्या प्रतिनिधींचा अभिप्राय, दोन निमंत्रित अभ्यासक किंवा समीक्षकांचे भाष्य आणि शेवटी अध्यक्षीय समारोप असा कार्यक्रम असतो.

कवितेचा आशय, विषय, आकृतिबंध, अन्वयार्थ आणि साहित्यिक मूल्य अशा विविध अंगांनी या चर्चेत विचार केला जातो. सामान्य वाचकालाही कविता समजावी, तिचा आस्वाद घेता यावा आणि तिच्यावर स्वतचे विचार मांडता यावेत, हा महत्त्वाचा हेतू आहे.

या चर्चासत्रांचे वाचकपीठाच्या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण केले जाते. त्यानंतर रेकॉर्डिंग करून हे कार्यक्रम यूटय़ूबवरही प्रकाशित होतात. आजवर या उपक्रमांतर्गत 82 कवितासंग्रहांवर चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील सुमारे 246 साहित्यिक, अभ्यासक आणि समीक्षकांनी या चर्चासत्रांत सहभागी होऊन आपले चिकित्सक विचार मांडले आहेत. तसेच वाचकपीठाच्या सदस्यांनीही अभ्यासपूर्ण अभिप्राय दिले आहेत. एकूणच या कवितासंग्रहांच्या चर्चेत साडेतीनशेहून अधिक वाचक, जाणकारांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. सुरुवातीच्या काही भागांखेरीज नंतरची बहुतांश चर्चासत्रे यूटय़ूबवर उपलब्ध आहेत.

वाचकपीठाचे कार्य कविता आणि चर्चासत्रांपुरते मर्यादित नाही. दिवाळी, जागतिक पुस्तक दिन अशा विविध प्रसंगांचे औचित्य साधून संस्थेतर्फे विशेष कार्यक्रमही आयोजिले जातात. याशिवाय वार्षिक मेळावे आयोजिले जातात. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि पुणे विद्यापीठ अशा विविध ठिकाणी हे मेळावे झाले आहेत. तसेच दुर्गम भागांतील प्राथमिक शाळांमध्ये पुस्तकपेटय़ा उपलब्ध करून देणारे फिरते वाचनालयही चालवले जाते.

या उपक्रमांचे वैशिष्टय़ म्हणजे ते विनामूल्य आणि कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता राबवले जातात. संस्थेसाठी लागणारा निधी स्वत उभा केला जातो. साहित्याबरोबरच अन्य क्षेत्रांतील वाचकही मानापमानाची अपेक्षा न ठेवता आत्मीयतेने जबाबदाऱ्या स्वीकारतात आणि चळवळ पुढे नेतात.

वाचन संस्कृती जोपासणारे आणि कवितेला हक्काचे व्यासपीठ देणारे ‘वाचकपीठ प्रतिष्ठान’ हे साहित्यप्रेमींचे व्यासपीठ आहे. अधिकाधिक कवी-वाचकांनी सहभागी होऊन ही चळवळ व्यापक करावी, हीच अपेक्षा! त्यासाठी vachakpithprtishthan@gmail. या ई-मेल आयडीवरून संपर्क साधा.

Comments are closed.