फिरूनी नवी जन्मेन मी! 12 मे रोजी विलेपार्ले येथे आशा भोसले यांच्या सुमधुर मराठी गीतांची मैफल
दिवंगत ख्यातनाम गायिका आशा भोसले म्हणजे एक अविस्मरणीय सुरेल युग. आशाताई आपल्या सात दशकांच्या संगीत कारकीर्दीचा अनमोल असा संगीत खजिना आपल्यासाठी ठेवून गेल्या आहेत. त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने मराठी संगीत विश्व समृद्ध केले.
भावगीत असो किंवा ठसकेबाज लावणी, आशाताईंच्या आवाजाची कमाल जादू अनुभवास मिळते. आशाताईंच्या मराठी सांगीतिक आठवणींना उजाळा देणारी ‘फिरूनी नवी जन्मेन मी’ ही मैफिल येत्या 12 मे रोजी रंगणार आहे.
मेरक इव्हेंट्स आणि जीवनगाणी आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना संयोजन मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर यांची आहे. प्राजक्ता सातर्डेकर, केतकी चैतन्य, शाल्मली सुखटणकर, राधिका नांदे, आसावरी जोशी अशा नामवंत कलावंताच्या साथीने ही मैफल सादर होईल.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन-अमित गोठीवरेकर, निवेदन-मिलिंद कुलकर्णी यांचे आहे. ‘फिरूनी नवी जन्मेन मी’ कार्यक्रम मास्टर दीनानाथ मंगेशकर, विलेपार्ले पूर्व येथे सायंकाळी 4.30 वाजता होईल. त्याच्या विनामूल्य प्रवेशिका शुक्रवार, 8 मेपासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील.
Comments are closed.