भटकंती – निसर्गाच्या कुशीतील मनःशांती
>> आशीष बनसोडे
ashishbans26@gmail.com
शिवनेरी किल्ल्यापासून जवळच असलेला दाऱयाघाट तसा पर्यटकांना अपरिचित. इथलं अनाघ्रात निसर्गसौंदर्य सुखद आणि आल्हाददायक अनुभव देतं. निसर्गसंपदेचा मनमुराद आनंद देणाऱ्या जुन्नरमधील हे ठिकाण आवर्जून भेट द्यावे असेच.
वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचा ऱहास होऊन सिमेंटचे जंगल वाढू लागले आहे. वृक्षांची बेसुमार होत असलेल्या कत्तलींमुळे विविध जातींची व आवश्यक वृक्षे नाहीशी होऊ लागली आहेत. शाळेत मुलांना झाडांचे आणि पर्यावरणाचे महत्त्व शिकवले जाते, पण परिस्थिती काही वेगळीच आहे. अशा स्थितीत नाणेघाट, माळशेज घाट, लेण्याद्री यांसारख्या शहरांपासून जवळच असलेला निसर्गाचा खजिना पर्यटकांना हवाहवासा वाटतो. सुट्टीच्या दिवशी किंवा सुट्टी घेऊन अनेक जण निसर्गाच्या सान्निध्यात सुख शोधण्यासाठी या पर्यटनस्थळी आवर्जून जात असतात. असेच एक ठिकाण आता नावारूपाला येऊ पाहत आहे… ते म्हणजे दाऱ्याघाट.
निसर्ग, गडकिल्ले, बुद्धकालीन लेण्या, छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेला शिवनेरी किल्ला, धरणे, नद्या, नाणेघाट, माळशेज घाट असा खजिना असलेल्या पुणे ग्रामीणच्या जुन्नर तालुक्यात दाऱयाघाट हेदेखील देखणं आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेलं विलोभनीय पर्यटनस्थळ आहे. दाऱयाघाट म्हणावा तितका अद्याप प्रसिद्ध झालेला नाही, परंतु ट्रेकर्सचा येथे ओढा असतो. तिन्ही बाजूला डोंगरांचा वेढा, नजर जाईल तिथपर्यंत विविध झाडांच्या रूपात पसरलेला हिरवळीचा गालिच्छा, धुकं आणि ढगांची पसरलेली चादर व त्यातून डोकावणारे डोंगर, ठिकठिकाणाच्या अंतरावर कोसळणारे छोटे-मोठे आकाराचे धबधबे, झुळझुळ वाहणारे ओढे, रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांनी कसलेल्या शेतजमिनी, पावसाचा वर्षाव आणि त्यामुळे वातावरणात निर्माण झालेला हवाहवासा वाटणारा थंडावा असा निसर्गाचा अनमोल ठेवा याची देही याची डोळा अनुभवास मिळतो. मुख्य स्थळ गाठून डोंगरावर गेल्यानंतर चहूबाजूला दिसणारा नजराणा तर वेड लावतो. निसर्गाचे अद्भुत रूप सगळं दुःख, वेदना, टेन्शन विसरण्यास भाग पाडते. दाऱयाघाटात बरेच लहान-मोठे धबधबे आहेत. कच्च्याबच्यांसह महिला, वृद्धांना त्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटण्याची मज्जाच काही सुखद असते. विशेष म्हणजे तिथे थोडी काळजी घेतली तरी पिकनिकचा मनसोक्त व मनमुराद आनंद लुटता येतो. घरून जेवण वगैरे घेऊन गेल्यावर तर आणखी मस्त. छानपैकी धबधब्याखाली भिजल्यानंतर हिरवळीवर बैठक मारून मज्जामस्ती करत सर्वांनी एकत्र सोबत आणलेल्या जेवणावर ताव मारण्याचा वेगळाच अनुभव मिळतो. आल्हाददायक वातावरणात सर्वांसोबत जेवणाचा आनंद घेण्याची मज्जाच मोठं सुख देऊन जातं.
जुन्नर तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीमध्ये हे दाऱयाघाट नावाचे अप्रतिम ठिकाण आहे. शिवनेरी किल्ल्यापासून 22 किमीवर दाऱयाघाट आहे. माळशेज घाट, लेण्याद्री येथील बुद्धकालीन लेण्या, नाणेघाट या जोडीलाच दाऱयाघाट वसलेला आहे. बस अथवा खासगी वाहनांनी तेथे सहज जाता येते. डोंगराच्या पायथ्याशी वाहने पार्क करायची व्यवस्था असून तेथेच भाजलेली कणसं, मॅगी, पिठलं-भाकरी, डाळ-भात आदी पोटाची खळगी भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण सोबत खाद्यपदार्थ घेऊन गेल्यास निसर्गाच्या सान्निध्यात हिरवळीवर ठिय्या देऊन मस्त पोटोबाला प्रसन्न करण्याचा सुखद क्षण वेगळाचा आनंद देऊन जातो.
इथला निसर्ग हिरमोड करत नाही अन् माघारी परतताना तोहक, आल्हाददायक अनुभव देतो. सध्याच्या रील्स, फोटोसेशनसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच म्हणावे लागेल. पर्यटन वाढल्यास तेथील ग्रामस्थांनादेखील उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल. थंडीच्या महिन्यातही दाऱयाघाट मनाला शांती मिळवून देतो. तेथील वातावरण मन प्रसन्न करणारे एक नैसर्गिक जालीम औषधच म्हणावे लागेल. म्हणूनच दाऱयाघाट पर्यटकांच्या पसंतीस पडू लागला आहे.
Comments are closed.