दिल्ली दरबारी लाचारीचा नवा अंक! अशोक चव्हाणांच्या तोंडी भाजपची भाषा; काँग्रेसने केला जबरदस्त पलटवार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आयाराम गयाराम संस्कृती वाढत आहे. काहीजण स्वार्थासाठी किंवा ईडीपासून बचावासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत भाजपवासी झाले. आता त्यांच्या तोंडी भाजपचीच भाषा असून ते आधीच्या पक्षावर टीका करत आहे. अशा पक्ष बदलणाऱ्यांवर काँग्रसने जबरदस्त पलटवार केला आहे.

काही वर्षांपुर्वी भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाण यांनी महिला आरक्षणावरून नांदेड येथे प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींचे गुणगाण करत काँग्रेसवर टीका केली. या टीकेला काँग्रेसने सणसणीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या या पलटवारामुळे चव्हाणांना आता सारवासारव करण्यासाठी नवी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या ‘नारीशक्ती’ जुमल्याचे कौतुक करताना चव्हाणांना अचानक साक्षात्कार झाला की, विरोधकांमुळेच महिलांचे आरक्षण रखडले आहे. चव्हाणांनी भाजपची भाषा वापरत पोपटपंची करताच राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त झाला. चव्हाणांच्या या विधानावर काँग्रेसने जो पलटवार केला, त्याने भाजपचीही बोलती बंद झाली आहे.

काँग्रेसने कठोर शब्दात चव्हाणांना त्यांच्या कौटुंबिक वारशाची आठवण करून दिली. ज्या काँग्रेसशी तुमचे वडील शंकरराव चव्हाण आयुष्यभर एकनिष्ठ राहिले, त्या पक्षाशी गद्दारी करण्यापूर्वी किमान आरक्षणाचा इतिहास तरी वाचायला हवा होता, अशा शब्दांत काँग्रेसने चव्हाणांना सुनावले. चव्हाणांना पहिल्यांदा लोकसभेत पाठवणाऱ्या राजीव गांधींनीच स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना आरक्षण दिले होते, याची आठवणही करून दिली. खाल्लेल्या मिठाला जागायला शिका आणि पाठीचा कणा थोडा तरी मजबूत ठेवा, असा सल्लाही त्यांना दिला. हा वार त्यांच्या इतका जिव्हारी लागला की, सत्तेसाठी दिल्लीचे उंबरठे झिजवणाऱ्या चव्हाणांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली.

काँग्रेसच्या या प्रहारानंतर चव्हाणांनी लगेच घुमजाव करत काँग्रेसच्या काळातील निर्णयांचा मी अनादर करत नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, एका बाजूला भाजपच्या धनशक्तीचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला जुन्या मिठाची आठवण आली की पायाखालची वाळू सरकल्यासारखे वागायचे, हा चव्हाणांचा दुतोंडीपणा आता उघडा पडला आहे. ‘आदर्श’ राजकारणाची भाषा करणाऱ्यांनी दिल्लीच्या चरणी आपली निष्ठा गहाण ठेवली असली, तरी महाराष्ट्राची जनता हा ‘लाचारीचा अंक’ विसरणार नाही, हेच या कलगीतुऱ्यातून स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.