देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचे भाजपचे षडयंत्र विरोधकांनी हाणून पाडले, वडेट्टीवारांची सडकून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण हे देशाच्या पंतप्रधानांचे नसून भाजपच्या एका नेत्याचे होते. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले हे भाषण आचारसंहितेच्या मर्यादा ओलांडणारे आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. भाजपने रचलेल्या राजकीय कट कारस्थानांचा समाचार घेताना त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 50 हून अधिक वेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. महिला आरक्षणावरून भाजप केवळ इव्हेंटबाजी करत असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसच्या योगदानाची आठवण करून दिली. काँग्रेसने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान आणि पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचे ऐतिहासिक पाऊलही काँग्रेसनेच उचलले होते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीला मतदारसंघ पुनर्रचना होईपर्यंत स्थगित ठेवण्याच्या निर्णयावर वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला. हा सत्ता टिकवण्यासाठी रचलेला कुटिल डाव असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, या विधेयकात अनुसूचित जाती, जमाती आणि विशेषतः ओबीसी (OBC) महिलांच्या आरक्षणाची तरतूद का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बहुजन समाजातील महिलांचा हक्क डावलून केवळ मर्जीतील लोकांना सत्तेत बसवण्याचे हे षडयंत्र आहे. मनुस्मृतीचा विचार मानणारा भाजप महिलांना केवळ दुय्यम स्थान देतो. आरएसएस कधी महिलेला प्रमुख पदाची जबाबदारी देईल का? असा बोचरा सवालही त्यांनी विचारला.
देशातील आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. “रेल्वे, एअरपोर्ट, वीज प्रकल्प, सिमेंट आणि स्टील उद्योग हे सर्व नियम धाब्यावर बसवून अदानींच्या घशात घातले जात आहेत. भाजप आणि अदानी एकमेकांना पूरक असून ते देशाला लुटत आहेत. यामुळे देशातील जनता गरीब होत आहे आणि अदानी मात्र श्रीमंत होत आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
देशाचे संविधान धोक्यात
देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचा भाजपचा कट होता, जो सध्या तरी अयशस्वी ठरला आहे. भाजप पुरस्कृत भोंदू बाबा आणि धर्मांध शक्ती देशात तेढ निर्माण करत आहेत. महिलांच्या नावाखाली आपली सत्ता वाचवण्याचे भाजपचे हे प्रयत्न देशातील जागरूक महिलांना नक्कीच समजतील, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments are closed.