ब्लेसिंग मुझारबानीच्या एजंटने केला पाकिस्तान क्रिकेटचा पाणउतारा! म्हटले, “करारच झाला नाही, तर बंदी….”
झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. त्याच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) सर्वाधिक नाराज झालेले दिसले. आयपीएलआधी मुझारबानीला पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ साठी इस्लामाबाद युनायटेडने करारबद्ध केले होते, मात्र त्याने पीएसएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि आयपीएलकडे वळला. यामुळे, पीसीबीने मुझारबानीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावर २ वर्षांसाठी पीएसएलमधून बंदी घातली. त्यांच्या या भुमिकेवर मुझारबानीचा एजंटने स्पष्टीकरण दिले आहे.
मुझारबानीचा एजंट डब्ल्यूएसएक्स क्रिकेटने पीसीबीच्या बंदीच्या निर्णयावर सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएल या दोघांवरही जोरदार टीका केली आहे.
या निवदेनमध्ये त्यांनी म्हटले, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की पीएसएलकडून करार मिळाल्याशिवाय एनओसी मिळू शकत नाही. आम्हाला २७ फेब्रुवारीपर्यंत पीएसएल किंवा इस्लामाबादकडून कोणताही करार मिळाला नव्हता. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने आमच्याशी संपर्क साधला आणि त्वरित सर्व व्यवस्था केली. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की मुझारबानी पीएसएलच्या लिलावाचा भाग नव्हता. जर आम्हाला करारच मिळाला नाही, तर तो करार कसा काय रद्द करू शकतो.”
“हे लोक केवळ द्वेष पसरवत असून आम्ही काही काळ शांत होतो, मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आम्हाला केवळ मुझारबानीवरील बंदी उठवली जावी आणि परिस्थिती पूर्ववत व्हावी”, असे त्या निवेदनात पुढे म्हटले आहे.
इस्लामाबाद युनायटेड आणि पीएसएलने मुझारबानीच्या कराराची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली होती. तसेच केकेआरने त्याला मुस्तफिजुर रहमानच्या जागी संघात घेतले. त्याने आयपीएलमध्ये पदार्पणात एकही विकेट घेतली नाही, मात्र सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध त्याने ४ विकेट्स घेण्याची प्रभावी कामगिरी केली.
Comments are closed.