अशोक खरातकडून स्थानिक ग्रामस्थांना दमदाटी, वस्तीकडे जाणारा रस्ता केला बंद, दोन वर्षापासून कुटुं
अशोक खरात: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (Ashok kharat) याच्याविरोधातील गंभीर आरोप उघड होत असतानाच, आता स्थानिक ग्रामस्थांना दिलेल्या त्रासाचे धक्कादायक प्रकारही समोर येऊ लागले आहेत. मिरगाव येथील शेतकरी भागवत शेळके यांच्या कुटुंबाने अनुभवलेला प्रकार याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
भागवत शेळके यांच्या शेतात आणि वस्तीकडे जाण्यासाठी असलेला पारंपरिक वहिवाटीचा रस्ता सुमारे दोन वर्षांपूर्वी अशोक खरात याने बंद केल्याचा आरोप आहे. या रस्त्यावर लोखंडी जाळी उभारण्यात आली, ज्यामुळे शेळके कुटुंबाचा त्यांच्या स्वतःच्या शेत आणि घराशी संपर्क तुटला. परिणामी, त्यांना वस्तीकडील घर सोडून गावातच एका तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची वेळ आली.
Ashok Kharat: दोन वर्षापासून कुटुंबाचा पत्राच्या शेडमध्ये संसार
गेल्या दोन वर्षांपासून आठ सदस्यांचे हे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. पत्र्याचे छप्पर आणि ग्रीन नेटच्या भिंतींच्या आडून ऊन, वारा आणि पावसापासून स्वतःचे संरक्षण करत ते दिवस काढत आहेत. विशेष म्हणजे, शेळके कुटुंबाने आपल्या मूळ जागेवर दोन ते तीन लाख रुपये खर्च करून नवीन घर उभारले होते, मात्र रस्ता बंद झाल्याने त्यांना त्या घरात राहणेही शक्य झाले नाही.
Ashok Kharat: भावा-भावाची झाली ताटातूट
या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. स्थानिक पातळीवरही कोणी दखल घेत नसल्याने आणि खरातच्या कथित दबावामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याचे धाडसही कुटुंबाने केले नाही, अशी माहिती समोर येत आहे. रस्ता बंद केल्यामुळे केवळ राहण्याचाच प्रश्न निर्माण झाला नाही, तर शेतीवर जाणेही अशक्य झाले. यामुळे कुटुंबात फूट पडली असून, एका बाजूला एक भाऊ तर दुसऱ्या बाजूला दुसरा भाऊ आणि त्याचे कुटुंब अशा प्रकारे विभक्त राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता ईशान्येश्वर मंदिर परिसरातून जात होता, जो नंतर पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा आरोप आहे.
Ashok Kharat: रुपाली चाकणकर यांच्याकडेही तक्रार, पण…
या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची खंत शेळके कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली आहे.
अशोक खरात : अशोक खरातची पुन्हा एसआयटी चौकशी
दरम्यान, नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणात आज पुन्हा तपासाला वेग आला आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) खरातची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, माध्यमांच्या नजरेत न येण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत, खरातला मागील दरवाजातून चौकशीसाठी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आधीच गंभीर पुरावे समोर आले असून, पुढील चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.