अशोक खरातकडे कोट्यवधींची ‘माया’, राज्य सरकार कारवाईचा फास आवळणार, SIT चौकशीला वेग; बडे अधिकारी
नाशिक: स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat Crime News) याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर, आता विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे खरातचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. (Ashok Kharat Crime News)
तांत्रिक पुराव्यांवर पोलिसांचा भर
SIT कडून सध्या खरातचे फोन कॉल्स, चॅट्स आणि सोशल मीडिया अकाऊंट्सची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या धक्कादायक व्हिडिओंमधील पीडितांना न्याय मिळवून देणे, हा तपासाचा प्राथमिक उद्देश आहे. या व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या महिलांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे. (Ashok Kharat Crime News)
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या तथाकथित ‘दरबारात’ अनेक बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वावर होता. धक्कादायक बाब म्हणजे, या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातने अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी-विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची आणि ‘खरात नेटवर्क’ची साखळी पोलीस आता शोधून काढणार आहेत. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी खरातने मोठी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. यामध्ये प्रामुख्याने पाथर्डी-गवळाणे, सिन्नर परिसर, शिर्डी-ओझर पट्टा या परिसरात गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. (Ashok Kharat Crime News)
अनेकांच्या जमिनी हडपल्याच्या आणि काहींवर अवैध कब्जा केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या जमिनींची खरेदी नेमकी कोणाच्या पैशातून झाली आणि त्यात कोणत्या बड्या हस्तींचे हितसंबंध गुंतलेले आहेत, हे पोलीस तपासात लवकरच स्पष्ट होईल. जप्त केलेले मोबाईल आणि लॅपटॉपचा डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. खरातला या काळ्या कृत्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांची धरपकड होणार आहे. त्याला कोणी मदत करत होतं का याचाही तपास सुरू आहे. बँकांचे व्यवहार आणि काळ्या पैशाचा वापर यांची चौकशी होणार आहे. (Ashok Kharat Crime News)
नेमके प्रकरण काय? फिर्यादीत काय म्हटले?
नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरातील कॅनडा येथील एका इमारतीमध्ये अशोक खरात याच्या कार्यालयात आपल्यावर अत्याचार झाल्याचे एका पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. खरात याने फिर्यादी महिलेचा भावनिक, धार्मिक विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले. संमोहित अवस्थेत २ पीडिता गेल्यानंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन खरातने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Ashok Kharat Crime News)
कोण आहे कॅप्टन अशोक खरात ?
अशोक खरात हा मर्चेंट नेव्हीमध्ये सेवेत होता. २२ वर्षे सेवा बजावल्यानंतर तो निवृत्त झाला. त्याने १५४ देशांमध्ये प्रवास केल्याची चर्चा आहे. सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी खरात, तर सदस्यांमध्ये रूपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. सेवानिवृत्तीनंतर अंक शास्त्र अन् ज्योतिषी म्हणून व्यवसाय सुरू केला. राज्यातील मोठे मंत्री खरातकडे ‘भविष्य’ जाणून घेण्यासाठी येऊ लागल्याने सर्वत्र तो चर्चेत आला. खासगी विमानाने प्रवास करण्यापासून त्याची ‘लॅव्हिश लाइफस्टाइल’ अनेकांना चक्रावून टाकणारी होती.
आणखी वाचा
Comments are closed.