भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायब

नाशिक : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्पना खरात यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार झाल्याची माहिती आहे. कल्पना खरातत्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिली.

अशोक खरातसोबत आता त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या फरार झाल्याची माहिती असून पोलिसही त्यांच्या मागावर आहेत.

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार आणि अटक करणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आहे.

Kalpana Kharat : शिर्डीत कल्पना खरातवर गुन्हा दाखल

शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदीप्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर खरातची पत्नी फरार झाल्याची माहिती आहे. अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोट्यवधींची मालमत्ता आहे. या सर्व व्यवहारांची एसआयटी चौकशी करत आहे.

स्पॉट व्हिजिटसाठी 5 ते 20 लाख

भोंदू खरात आणि त्याचे डोकं चक्रावणारे कारनामे सातत्यानं समोर येत असतानाच आता खरातचा नवा धक्कादायक बनाव समोर आला आहे. खरात ‘स्पॉट व्हिजिट’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचं उघड झालं आहे. या भेटीसाठी खरात तब्बल 5 लाख ते 20 लाखांपर्यंत फी उकळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकांच्या घरी, कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो महागड्या गाड्यांची मागणी करत असे. काही भक्तांकडून त्यानं अशाप्रकारे गाड्याही मिळवल्याचे समोर आलं आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याच्याकडे भक्तांची मोठी गर्दी होत असे. जास्त पैसे देणाऱ्या भक्तांना तो प्राधान्य देत असल्याचेही एसआयटीच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.