आश्रमशाळा चालकाचा मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून छळ, अनुदानासाठी 35 लाखांची मागणी! संस्थाचालकाचा गंभीर आरोप
आश्रमशाळेचे रखडलेले अनुदान देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून छळ केला जात असून, त्यांच्या स्वीय सहायकामार्फत 35 लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप संस्थाचालक अरुण निटुरे यांनी केला आहे. दलित वस्ती सुधार योजनेतील कामांसाठीही पैशांची मागणी होत असल्याचेही निटुरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशाराही निटुरे यांनी दिला आहे.
अरुण निटुरे यांनी 1998 मध्ये केशेगाव येथे रमाबाई आंबेडकर आश्रमशाळा सुरू केली. या आश्रमशाळेला 2019 मध्ये 20 टक्के अनुदान मंजूर झाले. परंतु अद्यापपर्यंत मंजूर अनुदानातील एक पैसाही मिळालेला नाही. यासंदर्भात निटुरे यांनी शासनदरबारी वारंवार खेटय़ा घातल्या. मात्र त्यांच्या पदरी उपेक्षाच आली. आज त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करून आपली व्यथा त्यात मांडली. सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांचे पीए भंडारे यांनी 24 विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी तसेच रखडलेले अनुदान देण्यासाठी 35 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप निटुरे यांनी या व्हिडीओत केला आहे.
Comments are closed.