अश्विनी बिद्रे यांच्या पती, मुलीला वारसाहक्क मिळेना, ठाणे पोलिसांकडून अडवणूक; कोर्टात जाण्याचे फर्मान
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडानंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी पती राजू गोरे आणि मुलगी सूची गोरे यांनी सुरू केलेली संघर्षाची लढाई संपण्याचे नाव घेत नाही. कुटुंबाने दिलेल्या मोठ्या लढ्यानंतर हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली असली तरी गोरे कुटुंबाची साडेसाती पोलीस दलाने अद्यापही कायम ठेवली आहे. अश्विनी यांनी आपले वारस म्हणून वडील, पती आणि मुलगी यांच्या नावाचा उल्लेख केलेला असतानाही हाच वारसाहक्क सिध्द करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी गोरे कुटुंबाला न्यायालयात जाण्याचे फर्मान काढले आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर राजू गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी गोरे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी मीरा रोडमधील घरी हत्या केली. या हत्याकांडाला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. कुरुंदकर याला या हत्याकांडात शिक्षा व्हावी यासाठी राजू गोरे यांनी मोठा संघर्ष केला. त्यामुळे कुरुंदकरला या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र हाच संघर्ष गोरे कुटुंबाचा अजूनही सुरूच आहे. अश्विनी यांच्या मृत्यूच्या दाखल्यासाठीही त्यांना मोठा लढा उभारावा लागला होता. त्यामुळे गेल्या महिन्यात हा दाखला त्यांना पनवेल महापालिकेने दिला. या दाखल्यानंतर अश्विनी यांच्या नातेवाईकांना पोलीस दलाकडून तातडीने लाभमिळणे आवश्यक होते. मात्र हे लाभ देताना ठाणे ग्रामीण पोलिसांनी गोरे कुटुंबाची मोठी अडवणूक चालवली आहे.
अश्विनी बिद्रे यांनी ठाणे पोलिसांकडे ३ मार्च २०१५ रोजी आपल्या वारसांची नोंद केली आहे. त्यामध्ये पती राजू गोरे, मुलगी सूची गोरे आणि वडील जयकुमार बिद्रे यांचा समावेश आहे. मात्र हाच वारसाहक्क सिध्द करण्यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात जाण्यास सांगितले आहे, असा आरोप राजू गोरे यांनी केला आहे.
अश्विनी यांच्या मृत्यूनंतरचे लाभ मिळत नसल्यामुळे मुलगी सूची हिच्या शिक्षणात अडचण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर हे लाभ लवकर मिळाले नाही तर सूचीच्या उच्च शिक्षणावर परिणाम होईल, अशी खंत राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.